कोल्हापूर :
पावसाळ्यामध्ये करण्यात येणाऱ्या वैयक्तीक आणि संस्थात्मक कामासाठी आवश्यक साहित्याच्या उत्पादन करणाऱ्या घटकासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशामध्ये छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टिक शिट, ताडपत्री, रेनकोट इत्यादी वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने व घटक सुरु राहतील. दि. 15 ते 20 मे या कालावधीत चक्रीवादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती, सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपयायोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने व इतर घटक. ही दुकाने सकाळी 7 ते 11 या कलावधीमध्ये सुरु राहतील.
सर्व दुकानदारांनी कर्मचाऱ्यांची कोव्हिड-19 तपासणी करावी. 45 वर्षावरील व्याधीग्रस्त किंवा 60 वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांची नियमाप्रमाणे लसीकरण करणे बंधनकारक आहे. त्या त्या स्थानिक प्राधिकरणाने याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
सर्व दुकानदारांनी कोव्हिड वर्तणुकीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. नियमाचे भंग करणाऱ्या दुकान व्यावसायिक व घटक यांच्याकडून 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघटन झाल्यास दुकाने/घटक हे कोव्हिड-19 संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत बंद करण्यात येतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशान्वये स्पष्ट केले आहे.