नामांकित डॉक्टरांच्या ठेवीवर कर्ज काढून बुडविण्याचा माजी अध्यक्षांचा कारभार : कोपार्डे येथील सभेत हिंदुराव तोडकर यांचा हल्लाबोल
कोल्हापूर :
सध्याचे विरोधी गटाचे नेते बँकेचे अध्यक्ष असताना या अध्यक्षांच्या भोळ्या चेहऱ्याला पाहून एका डॉक्टराने विश्वास ठेवून ठेव पावतीवर कर्ज दिले. पण त्यांनी परतफेड केलीच नाही, शेवटी संचालकांनी त्या पावत्याच कर्जाला वर्ग करून घेतल्या. यांनी ते
कर्ज भरलेच नाही. ज्यांच्या भाच्याने बोगस कर्ज प्रकरण करून लाखोंचा अपहार केला. असला हा यांचा कारभार. असा उपरोधिक टोला लगावत हल्लाबोल केला. असले कारभारी आता सत्तारूढ गटावर बोलत आहेत. त्यांना सत्तारुढ गटावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी केली. याबाबतचे आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यशवंत बँक निवडणूक निमित्ताने संस्थापक सत्तारुढ यशवंत पॅनेलच्या प्रचारार्थ कोपार्डे येथील सभेत ते बोलत होते.
यावेळी हिंदुराव तोडकर म्हणाले, बँकेच्या ठेवी वाढवण्यासाठी शाखेनुसार प्रत्येकाला टार्गेट देऊन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी सर्वांनी मिळून हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच ठेवींचा १६० कोटींचा टप्पा आम्ही पार करू शकलो. यामध्ये चेअरमन एकनाथ पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि माजी अध्यक्ष म्हणतात की, ही नैसर्गिक वाढ आहे. मग तुमच्या काळात ठेवी का वाढल्या नाहीत?,: तुम्हाला का जमले नाही?. असा सवाल करत ठेवी काय अशा आभाळातनं पडतात काय? असा टोला हाणला.