विरोधकांनी त्यांचा चेअरमन पदाचा चेहरा दाखवावा : प्रा. वसंत पाटील यांचे आव्हान ( एकनाथ पाटील हाच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन )
कोल्हापूर :
यशवंत बँकेची प्रगती विरोधकांना त्यांच्या काळात करता आली नाही. काम करण्याची धमक एकनाथ पाटील यांच्यामध्ये होती म्हणून त्यांनी बँकेचे प्रगती झपाट्याने करून दाखवली. निवडणूक आली म्हणून आरोप करण्याचे काम विरोधकाकडून सुरू आहे, हे चुकीचे आहे. आमचा चेअरमन ठरलाय. तुमच्याकडे चेहराच नाही. तुमचा चेअरमन पदाचा उमेदवार कोण आहे, तो चेहरा सभासदांना दाखवावा, असे आव्हान प्रा. वसंत पाटील यांनी विरोधकांना देत यशवंत बँकेला एकनाथ पाटील हाच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.
यशवंत बँक निवडणूक निमित्ताने संस्थापक सत्तारुढ यशवंत पॅनेलच्या प्रचारार्थ कोपार्डे येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
प्रा. पाटील यावेळी म्हणाले, ठेवी वाढ, कर्जवाटप,एटीएम सुविधा, ई बँकिंग सुविधा या सर्व बाबतीत बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. नवीन शाखा काढून लांबच्या लोकांची सोय केली. अशा पद्धतीने व्यावसायिकता आणून बँकेची प्रगती करणे विरोधकांना सुचले नाही. निवडणूक आली म्हणून आरोप करत सुटले आहेत . आता चुकीचा कारभार झाला म्हणून सांगत आहात, मग तुम्ही तर या संचालक मंडळात अभ्यासू होता, त्यावेळी एखाद्या तरी निर्णयाला कधी विरोध केला नाही. त्यावेळी तुम्हाला काय चुकीचे दिसलें नाही. आताच कुठून चुकीचे दिसू लागले. एकनाथ पाटील यांनी आपली कर्तबगारी कामातून दाखवून दिली आहे. आज यशवंत बँक सभासदांच्या घराघरात नावाजलेली बँक म्हणून पोहोचली असल्याचे सांगितले.