बँकेतील मनमानी प्रवृत्ती मोडून काढू : अमर पाटील ( कसबा बीड येथे राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलचा प्रचार शुभारंभ धडक्यात )
कोल्हापूर :
सहा वर्षात चेअरमननी चार खोके एकदम ओके असाच कारभार केला आहे. गाडी डिझेल, ड्रायव्हर पगारवर वारेमाप खर्च केला आहे. तीन शाखा भाड्याच्या घरात असून तेथे ८७ लाखाचा फर्निचर खर्च केला. बारा तास बसून बँकेचा नव्हे तर स्वतः च्या सावकारकीसाठी बँकेचा वापर केल्याचा एकनाथ पाटील यांच्यावर आरोप करत बँकेतील ही मनमानी प्रवृत्ती मोडून काढू, असा निर्धार अमर पाटील यांनी केला.
कसबा बीड (ता.करवीर ) येथे राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्जेराव तिबिले होते.
अमर पाटील पुढे म्हणाले, चेअरमननी नेमलेल्या तीन वकिलाकरवी न बोलता समोरांसमोर बोलावे. स्वार्थासाठी बोलणाऱ्या यां लोकांनी संयमाने बोलावे. असे सांगून बुद्धीराज पाटील, डॉ. के. एन.पाटील, दादू कामिरे या तिघांच्या टिकेवर प्रहार केला. बाळासाहेब खाडे यांनी बिनविरोधसाठीच शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे आवर्जून सांगितले.
ऍड. प्रकाश देसाई म्हणाले, एकनाथ पाटील यांच्या हट्टामुळेचनिवडणूक लागली. सत्ताधारी मंडळी चेअरमन १२ तास राबले म्हणून सांगतात. मात्र बँकेचे कामकाज ८ तास चालते. कर्मचारी बँकेत नसताना चेअरमन काम करत असतील तर ते बँकेच्या कितपत फायद्याचे? असा सवाल उपस्थित केला.
शामराव सूर्यवंशी म्हणाले, महादेव मंदिरात शपथपूर्वक सांगतो की , मी व बाळासाहेब यांनी अखेरपर्यंत बिनविरोधसाठीच प्रयत्न केले. कोणत्याही पै पाहुण्यांचा विचार केला नाही.
कुंभी कारखान्याचे संचालक बी.बी.पाटील, संजय पाटील वाकरे यांचे मनोगत झाले. यावेळी संस्थापक शंकरराव पाटील, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, संभाजी पाटील कुडीत्रेकर, राजेंद्र सूर्यवंशी, कुंभी कारखाना संचालक उत्तमराव वरुटे, दादासो लाड, रवींद्र मडके, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्यासह समर्थक उपस्थित होते.