सहा महिन्यापूर्वी एकमेकांविरुद्ध लढणाऱ्यांनी स्वार्थासाठी नीतिमत्ता गुंडाळली : बुद्धीराज पाटील महेकर यांचा कसबा ठाणे येथील सभेत घणाघत ( कपबशीलाच निवडून देण्याचे केले आवाहन )
कोल्हापूर :
ज्यावेळेला युती करण्याचा विषय आला त्यावेळेला ज्यांच्या विरोधात सहा महिन्यापूर्वी कुंभी कारखान्यात एक वेगळा विचार घेऊन एकमेकांविरुद्ध लढलो त्यांनाच पाच जागा द्यायचा आणि त्यांचे नेतृत्व मानायचे हा प्रस्तावच कीव आणणारा होता. सहा महिन्यापूर्वी घेतलेली एक भूमिका व आता वेगळी भूमिका घेऊन सभासदासमोर कोणत्या तोंडाने जाणार. सत्तेसाठी नीतिमत्ता आम्ही सोडणार नाही, काय वाट्टेल ते झाले तरी सत्याच्या बाजूनेच राहणार अशी भूमिका घेऊन याला कडाडून विरोध केला. सहा महिन्यापूर्वी एकमेकांविरुद्ध लढणाऱ्यांनी स्वार्थासाठी नीतिमत्ता गुंडाळली आणि तिघाडी केली, असा घणाघात बुद्धीराज पाटील महेकर यांनी विरोधी गटाच्या नेतृत्वावर केला.
कसबा ठाणे येथे संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बाजीराव बापुसो पाटील हे होते.
बुद्धीराज पाटील पुढे म्हणाले, सुकाणू समिती सदस्य म्हणून जे काही घडले ते स्पष्ट सभासदाना सांगणे आमची जबाबदारी आहे. त्यामुळे थेट नावे घेऊनच मी बोलतो. अमर पाटील यांनी माझ्या नावाची टिंगल करून वेगळा शब्द वापरला. पण त्यांना सांगू इच्छितो, माझ्या आई व आत्याने अभिमानाने माझे नाव बुद्धीराज ठेवले आहे. आजोबा – वडिलांच्या पुण्याईने व स्वकर्तृत्वाने उभा आहे. तुमच्या मी बोलावे एवढे मोठे तुम्ही अजिबातच नाही. त्यामुळे आम्ही हा विषय येथे संपवतो. पण पुढे असेच चालू राहिले तर चिखलफेक ऐकून घेणार नाही. आम्ही पळ काढणारे नाही. एकनाथ पाटील यांच्या चांगल्या वाईट प्रसंगात ठामपणे उभा असेन. कुणालाही अंगावर घ्यायला लागले तर तेही घेऊ, असा इशाराही दिला.
एकनाथ पाटील यांनी खऱ्या अर्थाने बँक चांगली चालवून बँकेचा वटवृक्ष केला. ही बँक अशीच प्रगती करत राहो अशीच सभासद व आमचीही इच्छा आहे. एकनाथ पाटील यांनी बँकेची केलेली प्रगतीच अनेकांना खुपू लागली आणि षडयंत्र सुरु झाले. एकनाथ पाटील नको म्हणणारे कुरघोडी करू लागले. त्यात आमच्यातीलही काही जण होते. मात्र एकनाथ पाटील का नको याचे एकही कारण कुणाला सांगता आले नाही. त्यामुळे आपल्या कामाद्वारे वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि सभासदाना न्याय देणाऱ्या एकनाथ पाटील यांच्या पाठीशीच राहण्याचा निर्णय घेतला. सभासदही कपबशीलाच निवडून देतील असे सांगितले.
यावेळी निवास पाटील सर यांनी बँकेचा गेल्या सहा वर्षातील बँकेच्या कामगिरीचा आढावा घेऊन एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरु असून भविष्यात अधिकाधिक जोमाने सभासदांच्या हितासाठी काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले.
सभेला सर्व उमेदवार, उपसरपंच ऋषिकेश पाटील, उद्योजक दिलीप पाटील, यशवंत पाटील, धरण सोसायटी व्हा चेअरमन आनंदराव बळवंत पाटील, संचालक तुकाराम पाटील, युवराज पाटील, माजी सरपंच भाऊसो पाटील, गामा पाटील यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.