भ्रष्ट कारभाराचा बोलबोला असणाऱ्यांच्या ताब्यात बँक द्यायची का ? : डॉ.के.एन.पाटील यांची जोरदार टीका ( संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचा कसबा बीड येथे उत्साहात प्रचार शुभारंभ)
एकनाथ पाटील यांनी यशवंत बँकेसाठी रात्रंदिवस काम केले आहे. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून हजारो बेरोजगार व हताश झालेल्या मराठा युवकांना व्यवसायात उभे केले आहे. गेल्या सहा वर्षात झालेली बँकेची नेत्रदीपक प्रगती अनेकांच्या डोळ्यात खुपसू लागली आहे. कुंभी कारखाना, गोकुळ वा अन्य सहकारी संस्थात नोकरभरती झाली नाही का? असा सवाल करत जिल्हा परिषदेत ज्यांच्या भ्रष्ट कारभाराचा बोलबाला असणाऱ्यांच्या ताब्यात बँक द्यायची का ? अशी जोरदार टीका डॉ.के.एन.पाटील यांनी विरोधी नेतृत्वावर केली.
यशवंत बँक निवडणुकीसाठी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचा प्रचार शुभारंभ कसबा बीड (ता. करवीर) मोठ्या उत्साहात झाला. ज्येष्ठ शेतकरी नेते दादूमामा कामिरे यांच्या हस्ते येथील श्री महादेव मंदिरातून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थापक संचालक यशवंत निकम (यवलूज) हे होते.
एकनाथ पाटील म्हणाले, आम्ही टीकाटिप्पणीकडे जास्त लक्ष न देता गेल्या सहा वर्षात बँकेचा सभासदाभिमुख कारभार, बँकेचा चढता आलेख सभासदांच्या समोर आहे. आम्ही केलेल्या कामावर आम्हाला भरपूर बोलण्यासारखे आहे. गेल्या सहा वर्षात ७६ कोटी ठेवी होत्या त्या १६० कोटीवर नेल्या, ४३ कोटी कर्जे वाटप होती ११५ कोटीपर्यंत वाढवले. इ बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम सुविधा दिल्या. सभासदांना १५ % तर कामगारांना २१%डिव्हिडंड दिला. स्व भांडवल१० कोटीने वाढविले. बँकेला आज ५ कोटीपर्यंतचा नफा होत असून तो १० कोटीवर नेऊ. कर्ज व्याजाचा दर १४.९% होता तो १२.७०% केला. भविष्यात तो १०.५० % वर आणण्याचा मानस आहे. हजारो युवकांना व्यवसाय उभारी दिली याचा अभिमान आहे.
प्रा. वसंत पाटील म्हणाले, एकनाथ पाटील यांनी दोन पावले मागे येण्याची भूमिका घेऊनही विरोधकांनी आडमुठी भूमिका घेतली. चांगली बँक मोडीत काढण्याचा विरोधकांचा घाट मोडून काढूया. चांगल्या चालविलेल्या बँकेच्या पाठीशी राहण्यासाठी सर्वजण या पॅनेलच्या मागे राहूया.
दादू कामिरे म्हणाले, विरोधकांनी केवळ नातेवाईक यांचाच विचार पॅनेलमध्ये उमेदवार देताना केला आहे. मात्र एकनाथ पाटील यांनी सर्व भागाला न्याय मिळेल असे सर्वसमावेशक पॅनेल दिले आहे. बिनविरोध चर्चेवेळी एकनाथला विरोध का याचे एकही कारण विरोधकांना देता आले नाही. याआधी चेअरमनला भेटायला घरी जायला लागायचे मात्र एकनाथ पाटील यांनी १२ – १२ तास बँकेचे काम केले आहे. बँक अतिशय चांगली चालविली आहे.बँकेला एकनाथच हवा असे सांगून पॅनेलच्या विजयाच्या घोषणा दिल्या, त्याला उपस्थित सभासदांनी जोरदार प्रतिसाद दिला.
बुद्धीराज पाटील म्हणाले, बिनविरोधसाठी सुकाणु समिती काम करत होती. त्यावेळी समिती जे काही सांगिल त्यापद्धतीनेच जाऊ, तुम्ही सांगला तसे अशी भूमिका घेतली होती. मात्र दुसऱ्या गटात व्यक्तीदोषाचे राजकारण चालू राहिले. आमच्यातील काही मंडळीनी दुसऱ्याच्या दारात बसून समिती मोडण्याचे पातक केले. अमर पाटील यांनी तर समितीत वयाने, विचाराने मोठी असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा विचार न करता अपमानास्पद भाषा वापरली. आम्ही तर नवखे होतो. आम्हाला म्हणजे समितीला सगळेच सारखे होते. पण तुम्ही कोण सांगणार, समितीला कोण विचारतय अशी भाषा वापरली. हा सत्तेचा अहंभाव तुम्ही आम्ही उतरविला पाहिजे.
सभेत जोत्स्ना पाटील कुडित्रे म्हणाल्या, एक बेरोजगार व गरीब तरुण होता. त्याला बेकरी व्यवसाय करण्यासाठी कर्ज पाहिजे होते. पण आधीच्या चेअरमननी दिले नाही. मात्र एकनाथ पाटील चेअरमन झाल्यावर त्यांच्याकडे कर्जाची मागणी केली. त्यांनी सर्व त्रुटी दूर करून कर्ज प्रकरणाची सर्व कागदपत्रे पूर्तता करून कर्ज मंजूर करून दिले. मिळालेल्या कर्जमुळे त्या युवकाने व्यवसाय सुरु केला. आज त्याच्या दोन शाखाही त्याने सुरु केल्या. बेरोजगार युवकांना उभे करणे याला काम म्हणतात. ते एकनाथ पाटील यांनी करून दाखविले आहे.
सुरुवातिला सर्व उमेदवारांची ओळख व स्वागत सुधाकर देसाई यांनी केले. शेवटी आभार निवास पाटील सर यांनी मानले. याप्रसगी पल्लवी पाटील, तानाजी मोरे, प्रकाश पाटील, जोतिराम शेळके यांची भाषणे झाली. सभेला बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक, शामराव गोधडे, सूर्यकांत दिंडे, मोहन पाटील, बाजीराव पाटील, मा.सरपंच हंबीरराव चौगले, शिवाजी गायकवाड, सज्जन पाटील आदीसह प्रमुख कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते. उमेदवारांची ओळख व स्वागत सुधाकर देसाई यांनी तर आभार निवास पाटील यांनी केले.