करवीर :
सह्याद्री सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन, कोल्हापूर जिल्हा व संजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
बीडशेड (ता.करवीर) येथील ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित केेलेल्या रक्तदान शिबिरात ७० जणांनी सहभाग घेतला. तसेच युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
प्रारंभी शिरोली दुमाला प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे, कळे प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्यानंद शिरोलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ. मोरे यांच्या हस्ते सह्याद्री सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियनच्या नामफलकाचे फित कापून अनावरण झाले. युनियनच्या वतीने कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल डॉ. मोरे व डॉ. शिरोलीकर यांचा विशेष सत्कार झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यसनमुक्ती चळवळीचे अध्यापक एकनाथ कुंभार यांनी सर्वांशी संवाद साधून व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले.
प्रारंभी सर्जेराव कराळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास संजीवन ब्लड बँकेचे डॉ. सागर मोरे, डॉ. शैलेश पाटील, युनियनचे संतोष पाटील (मांडरे), रवींद्र कांबळे (सावर्डे दुमाला), वसंत पाटील (गोठे), अमर कांबळे, कृष्णात पौंडकर, लक्ष्मण देसाई, युवराज आणकर, राजू कांबळे, संतोष गडकर यांच्यासह संजीवन ब्लड बँकेचा स्टाफ, सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.