करवीर :
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे ग्रामपंचायत व कसबा बीड विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचे शिक्षक प्रशांत पोतदार यांची प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन पदी निवड झालेबद्दल माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे संचालक व सरपंच सत्यजित पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संदीप सुतार, उपाध्यक्ष महादेव गोते यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, फेटा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, नवोपक्रम हाती घेण्यासाठी शिक्षकांना योग्य ते सहकार्य राहील. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत झळकावेत ही अपेक्षा आहे.
गोकुळचे संचालक व सरपंच सत्यजित पाटील यांनी
पोतदार यांना निवडीबद्दल शुभेच्छा देऊन शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन प्रशांत पोतदार म्हणाले, शिक्षक बँकेने नेहमी सभासदांच्या विश्वासास पात्र राहून कारभार केला आहे. राज्यातील प्रमुख टॉप बँकेत कोल्हापूर जिल्ह्याची शिक्षक बँक अग्रेसर आहे. यापुढे सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करण्याचा मानस असल्याचे सांगून बँकेच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रारंभी स्वागत व प्रस्तावित भाषणात मुख्याध्यापक के.एल.खाडे यांनी ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती, पालक , ग्रामस्थ यांचे उचित मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे आवर्जून सांगितले.
शाळा कमिटी अध्यक्ष संदीप सुतार, उपाध्यक्ष महादेव गोते, उपसरपंच वैशाली सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास पाटील, दिनकर गावडे, श्रीमती वैशाली पाटील, अंजना कुंभार, ग्रामसेवक संदीप पाटील यांच्यासह दिनकर सूर्यवंशी, आत्माराम वरुटे, राहुल गावडे, अरुण सूर्यवंशी,
विलास थोरवत, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य उपस्थित होते. आभार प्रकाश सोनी यांनी मानले.