करवीर :
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सर्वसाधारण सभा ऑफलाईन घ्यावी, तसेच यंदाच्या हंगामातील डिसेंबरनंतरची ऊस बिले तात्काळ द्यावीत, अशी मागणी राजर्षी शाहू आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील,व शाहू आघाडीचे पदाधिकारी यांनी कुंभी चे उपाध्यक्ष निवास वातकर यांना दिले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे,कुंभी कारखान्याने १४ मार्च रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन घ्यावी, कारण कारखान्याचे सभासद असणाऱ्या शेतकर्यांकडे ऑनलाईन सभेसाठी आवश्यक असणारी साधने उपलब्ध नाहीत.यामुळे सभासदांना सभेत भाग घेता येणार नाही, अनेक सभासद इच्छा असूनही वर्षातून एकदा होणाऱ्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या हक्कापासून वंचित राहतील. चालू हंगामातील उसाची डिसेंबर २०२० नंतरची बिले अदा झालेली नाहीत. मार्च अखेर असून लग्नसराई आहे,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे उसाची बिले तात्काळ मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी चर्चा करताना यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले साखर विक्री साठी काय प्रयत्न केले, आणि जुनी साखर मोठ्या प्रमाणावर कुंभी मध्ये शिल्लक आहे. यावेळी दादू मामा कामीरे, म्हणाले कुंभीने शेअर काढलेत मात्र ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेअर खरेदी करता येत नाहीत. मार्च अखेर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर व्याजाचा भुर्दंड बसणार आहे.यावेळी एस. एम. पाटील यांनी मागील शंभर रुपये प्रमाणे चार कोटी ४० लाख रुपये ऊस उत्पादकांचे , देणे असून अनेकदा निवेदन देऊन कारखान्याकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. असे मत व्यक्त केले.
कोरोना मुळे कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा अडचणीत असताना तोडणी ओढनी करणाऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य केले आहे. पण त्यांची फक्त एक आठवड्याचीच बिले अदा केली आहेत. तरी त्यांची बिले अदा करावीत. हंगाम २०१७/१८ मधील सुमारे साडेचार लाख टनाचे शंभर रुपये प्रमाणे ऊस उत्पादकांचे बिल अद्याप दिलेले नाही, ते बिल तात्काळ द्यावे. कर्मचाऱ्यांचा अकरा महिन्याचा पगार देणे बाकी आहे, कोरोना असतानाही कामकाजात कोणतीही अडचण न आणता कर्मचारयांनी सहकार्य केले. तरी त्यांचे पगार अदा करून त्यांना तणाव मुक्त करावे, सर्व बाबींचा खुलासा करावा अन्यथा, तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी निवास पाटील,नामदेव पाटील, संभाजी पाटील, दादू कामिरे, युवराज पाटील, सुभाष पाटील, दिलीप कांबळे, बी. आर. पाटील, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते.
_____________
निवास वातकर, कुंभी कारखाना उपाध्यक्ष,
ऑफलाइन सभेची परवानगी मागितली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली आहे, पगार,व ऊस बिल शंभर रुपये देणार आहे.