करवीर :
करवीर तालुक्यातील गणेशवाडी येथे
घराच्या बांधकामांवर पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून साहिल भिवा चव्हाण (वय १८) या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
गावातील लाड गल्लीत चव्हाण कुटुंबियांचे घराचे बांधकाम सुरू आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साहिल हा बांधकामावर पाणी मारण्यासाठी आला होता. मोटर चालू झाल्यावर साचलेल्या पाण्यातून विजेचा शॉक त्याच्या पायाला लागला. दुपारची वेळ असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. काही वेळाने इमारतीच्या मागील बाजूस काम करत असलेल्या गवंड्याने पाहिल्यावर ही घटना लक्षात आली. तातडीने त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले पण तत्पूर्वीच त्याची प्राण गेला होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. साहिलच्या मागे आईवडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी आजोबा असा परिवार आहे.