करवीर :
कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाघजाई डोंगरात अज्ञातांनी आज चौथ्यांदा वणवा पेटविला. यामध्ये आतापर्यंत सुमारे ५०० एकर मधील डोंगर, जैवविविधता जळून खाक झाली, यामुळे पर्यावरणाची हानी झाली. या आगीत गवत, झाडे झुडपे, पशु पक्ष्यांची घरटी, जळावू लाकूड पेटले आहे.दरम्यान पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून दिवसभर आग विजवण्यासाठी धडपड केली, अग्निशामक दलाची गाडी आणून आग आटोक्यात आणली. या प्रकाराबद्दल अज्ञाताच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.आग विझवताना चिंचवडे येथील दोन तरुण जखमी झाले .अजय खाडे, शरद गुरव अशी त्यांची नावे आहेत.

पन्हाळा,आणि करवीर तालुक्याच्या सीमेवरील ऐतिहासिक वाघजाई डोंगर आहे. गेली अनेक वर्ष यात्रेला अज्ञातांकडून डोंगर पेटवला जात होता. याबाबत येथील तरुणांनी वाघजाई संवर्धन समिती स्थापन करून गेली दोन वर्ष डोंगर पेटू न देण्याचे यशस्वी काम केले आहे.
नुकतीच साध्या पद्धतीने यात्रा झाली आहे. दरम्यान दोन महिन्यात चार वेळा, पूनाळ, मरळी खिंडी परिसरातून अज्ञातांनी डोंगरात आग लावली आहे.
आज सकाळी ११ वाजता चिंचवडे येथील दरीतून अज्ञातांनी डोंगरात आग लावली,उनाचे प्रमाण वाढले असल्याने बघता बघता आगीने अख्खा डोंगर पेटू लागला,यावेळी,भामटे,कळंबे,
मरळी,चिंचवडे येथील निखिल तडूलकर ,सरदार तडूलकर, शरद गुरव, जोतिराम पाटील,संजय पाटील,बजरंग पाटील,बहाद्दूर अकॅडमी चे परशुराम खाडे व विद्यार्थी, तरुण यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, शेवटी पन्हाळा नगरपरिषदेची अग्निशामन दलाची गाडी बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान या आगीत आतापर्यंत सुमारे ५०० एकर डोंगर व जैवविविधता पेटून खाक झाली. त्यामध्ये कापलेले गवत, रचलेल्या गंज्या पेटल्या, जळाऊ लाकूड पेटले, ओली झाडेझुडपे पेटली, पशु पक्षांची घरटी पेटली,दरीच्या दिशेने आग झेपावत गेली,आणि यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ज्योतीराम पाटील, निसर्गप्रेमी युवक,
अज्ञातांनी सकाळी ११ वाजता आग लावली.अनेक तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा वाऱ्यामुळे आग वाढत जाऊन डोंगर पेटून २० टक्के राहिलेला डोंगर सुध्धा पेटला असता. डोंगर पेटून पर्यावरणाची हानी झाली आहे.