Tim Global :
आज रविवारी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.
यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा एक आठवडा आधी बेटांवर दाखल होईल, अशी शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज भारतीय समुद्रातील काही भागांत मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
नैऋत्य मोसमी वारे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या साथीनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत याठिकाणी ६४.५ मिमी ते ११५.४ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, हवामान विभागाने केरळ, तामिळनाडू, माहे आणि लक्षद्वीप परिसराला देखील पुढील चोवीस तासांसाठी सतर्कतेचा तीव्र इशारा जारी केला आहे. संबंधित ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येथे ६४.४ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
सध्या अरबी समुद्रातून दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भारताच्या दिशेनं जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. त्यामुळे १६ मे पर्यंत केरळसह कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू, माहे, लक्षद्वीप परिसरात अचानक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती रविवारी सकाळी हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.