मुंबई :
पुर्ण महाराष्ट्राला तौत्के चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे. तौत्के चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवर आहे.वादळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. अनेक झाडांची पडझड झालेली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग मंदावला असून पावसाची रिपरिप सुरु आहे.

आजही महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असं, असं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याला या वादळाचा मोठा फटका बसला आहे. सावंतवाडी ते वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर अनेक झाडं चक्रीवादळाने उन्मळून पडली आहेत. इलेक्ट्रिक पोलही अनेक ठिकाणी पडले आहेत. यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत.