महालक्ष्मी दूध बुडवणाऱ्यांचे गोकुळच्या ठेवीकडे लक्ष : विश्वास जाधव यांचे टीकास्त्र
पन्हाळा :
गोकुळ दूध संघाला स्पर्धा करण्यासाठी महालक्ष्मी दूध संघ काढला, त्याचे पुढे काय झाले?, हजारो दूध उत्पादक व सभासदांचे पैसे बुडवून दूध उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या खा. संजय मंडलिक यांनी गोकुळवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जोरदार टीका संचालक विश्वास जाधव यांनी केली.

सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या प्राचारार्थ पन्हाळा तालुक्यातील गोकुळ ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
विश्वास जाधव पुढे म्हणाले, तत्कालीन खासदारांनी आपल्या चिरंजीवाचे पुनर्वसन व्हावे म्हणून कागल तालुक्यात महालक्ष्मी दूध संघ काढला होता. गोकुळ दूध संघ मोडण्याची तयारी करताना त्यावेळी दूध उत्पादकांना २ ते ५ रुपये जादा दराचे अमिष दाखविले.या अमिषाला बळी पडून काही दूध संस्था महालक्ष्मीला दूध घालू लागले. पण तो संघ बुडवला आणि करोडो रूपये दूध उत्पादकांचे बुडले. आज तेच संजय मंडलिक आपल्या चिरंजीवाचे पुनर्वसन करण्यासाठी चिरंजीवला उमेदवारी देऊन गोकुळची निवडणूक लढवत आहेत. मात्र मागील अनुभव व महालक्ष्मी संघात बुडवलेले दूध उत्पादकांचे पैसे यामुळे खा. मंडलिक यांना गोकुळवर टीका करण्याचा अधिकार नसल्याची टीका केली.