तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

◆ सर्व तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा
◆ खेळाडूंना सोयी- सुविधा उपलब्ध करुन द्या

कोल्हापूर :

पन्हाळा तालुका क्रीडा संकुल लवकरात लवकर स्थापन होण्यासाठी आवश्यक जमीन मिळवण्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी, रवी कुमठेकर, उदय सरनाईक, आर. डी. पाटील तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी तालुका क्रीडा संकुल सद्यस्थितीची माहिती घेवून कागल, पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले यथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेबाबत आढावा घेतला. पन्हाळा तालुका क्रीडा संकुलासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात गावालगत समपातळीत असणारी व क्रीडा बाबींसाठी वापरण्यास योग्य किमान 5 ते 6 एकर जमीन आवश्यक आहे. अशी जमीन देऊ इच्छिणारे नागरिक व ग्रामपंचायतींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दहा दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करुन नागरिकांकडून उपलब्ध होणाऱ्या जागांची जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तपासणी करुन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंना शिवाजी स्टेडियम क्रीडांगणावर अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी येथील क्रीडागंण समपातळीत करणे, संरक्षक भिंत बांधणे, प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती, क्रीडा संकुलाला उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सध्याच्या गाळ्यांची भाडेवाढ करणे, जाहिरात पॅनलची उभारणी करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा. तसेच याठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी तसेच बँकांचे एटीएम केंद्र उभारण्याबाबत प्रयत्न करा,असे सांगून येथील जलतरण तलाव दुरुस्तीची उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी दिल्या.
जिल्हा क्रीडा संकुल मधील मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्क्यांनी वाढ देण्यास जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता दिली.

जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी क्रीडा संकुलांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी शेंडा पार्क येथे नवीन जागा मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!