शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १ नोव्हेंबरला कसबा बीड ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी दिंडी आंदोलन
करवीर :
शेतकरी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाला जाणीव करून देण्यासाठी सोमवारी १ नोव्हेंबर रोजी कसबा बीड (ता. करवीर) ते कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी कर्जमुक्ती सात बारा कोरा पायी दिंडी आंदोलन असल्याची माहिती आंदोलनकर्ते शेतकरी मुकुंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीडशेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा , प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार द्या, स्वामीनाथन आयोगाची केंद्र सरकारने अमंलबजावणी करावी, शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावी, नैसर्गिक आपत्तीमुळे, महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव भरपाई मिळावी, , शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा सुरू करावा आदि मागण्यासाठी हे आंदोलन करत आहोत.
सोमवारी सकाळी साडेसात वाजता कसबा बीड गावातील आझाद हिंद झेंडा चौकातून पायी दिंडी आंदोलनास सुरुवात होईल. महे , कोगे, पाडळी खुर्द , बालिंगा ,फुलेवाडी, रंकाळा , अंबाबाई मंदीर , शिवाजी चौक , दसरा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्गक्रम आहे. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरुद्ध नसून आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
पत्रकार बैठकीला दादासाहेब देसाई , राहूल पाटील , रणवीर पाटील , अनिल बुवा , प्रवीण पाटील , गिरीष देसाई , ओंकार पाटील आदी उपस्थित होते.