पंचायत समितीच्या स्वच्छता मोहिमेत अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत स्वतः राजेंद्र सूर्यवंशी सहभागी
कोल्हापूर :
महापुरामुळे कोल्हापुरातील दसरा चौकातील करवीर पंचायत समितीचे संपूर्ण कार्यालयाला पुराचा वेढा पडून प्रचंड नुकसान झाले आहे. गाळाने, कचऱ्याने माखलेले कार्यालय स्वच्छ करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी सुरुवात केली. या स्वच्छता कार्यात माजी सभापती व विद्यमान सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी स्वतः सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यालयाला पुराचा वेढा पडल्याने पंचायत समितीतील कागदपत्रे, संगणक, फर्निचर, खुर्च्या, टेबल यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. कार्यालयात पुरामुळे गाळ, कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने, कागदपत्रे भिजल्याने दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी यांनी स्वच्छता मोहीम, सर्व साहित्य बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. या मोहिमेत स्वतः राजेंद्र सूर्यवंशी यांनी सहभाग घेत अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.
कार्यालयातील सर्व विभागात गाळ असल्याने गाळ काढण्यासाठी टँकरची गरज होती. यासाठी भोगावती साखर कारखान्याच्या वतीने टँकर पाठविण्यात आला. टँकरच्या साहाय्याने कार्यालयातील गाळ धुऊन काढण्यात आले, भिंती स्वच्छ करण्यात आले. गाळाने माखलेल्या फारशी स्वच्छ धुऊन काढण्यात आल्या. खुर्ची, टेबल , कपाट बाहेर काढून स्वच्छ करण्याचे काम करण्यात आले.
यावेळी राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, पुरामुळे कार्यालयातील कागदपत्रे, फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यालयात गाळ व कचरा साचल्याने टँकरची गरज होती. यासाठी आमचे नेते भोगावती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार पी.एन.पाटील व उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर या तात्काळ कारखान्याचा टँकर पुरवून स्वच्छता कामाला विशेष सहकार्य केले. कार्यालयात दुर्गंधी वाढू नये यासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याने या कामाला गती देण्यासाठी आम्ही सहभागी झालो.