सत्ताधाऱ्यांनी सभासदांची विश्वासाहर्ता गमावली : व्ही.बी.पाटील (शिंगणापूर येथे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या स्नेहल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ)
कोल्हापूर :
संस्थापक मंडळींनी पै – पै जमवून, या परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांना सभासद करून कारखाना उभारला. तो नावारूपाला आणला. मात्र गेल्या १५ वर्षात कारखान्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. सत्ताधारी नरके गटाने ज्या विश्वासाने कारखाना चालवायला पाहिजे होता त्या पद्धतीने चालवला नाही. सत्ताधाऱ्यांनी सभासदांची विश्वासाहर्ता गमावली आहे. त्यामुळे परिवर्तन घडवूया असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी केले.
शिंगणापूर (ता. करवीर) येथे शिंगणापूर येथे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या उमेदवार स्नेहल उत्तम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामस्थांच्या वतीने व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते विशालतीर्थ देवीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी आघाडीच्या उमेदवार स्नेहल पाटील शिंगणापूर , राजश्री सुभाष पाटील वाकरे, शिवाजी तोडकर वाकरे, सर्जेराव ज्योती पाटील खुपीरे, बाजीराव पाटील कोगे, आनंदराव पाटील माणकू खुपीरे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी कॅप्टन उत्तम पाटील म्हणाले, कुंभी कारखाना एवढा कर्जबाजारी झाला आहे की तो खाजगीकरणाच्या घशात चालला आहे. त्यामुळे यांना वेळीच रोखण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. विजयी झाल्यास कारखान्यात स्वतः ची गाडी घेऊन, घरातील डबा घेऊन कामकाज पाहीन. कारखाना वाचविण्यासाठी अनुभव पणाला लावणार.
अमर पाटील शिंगणापूर म्हणाले, निवडणुकीत शिंगणापूर पॅटर्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. निवडणुकीत सक्रिय सहभाग आणि सर्वांपर्यंत पोहोचणे हाच शिंगणापूर पॅटर्न आहे. त्यामुळे या निवडणुकीतही त्याच ताकदीने हा पॅटर्न कार्य करणार आहे. त्यामुळे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा विजय नक्की आहे.शिंगणापूर आणि परिसरातील गावांचे कायम सहकार्य राहिले आहे, यापुढेही ते कायम राहावे, असे आवाहनही केले.
कार्यक्रमास जि. प.माजी शिक्षण सभापती व विद्यमान सरपंच रसिका पाटील, संग्राम भापकर, एस. के. पाटील, सुरेश रांगोळकर, यशवंत बँकेचे संचालक उत्तम पाटील, सुभाष पाटील, वसंत तोडकर, ज्ञानेश्वर विकास संस्थेचे चेअरमन विष्णू पाटील, ज्ञानेश्वर दूध संस्थेचे चेअरमन अजित पाटील, अनिल पाटील, सरदार पिंजरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.