शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अनादी कालापासून प्रलंबित असल्याचे आढळून आले
महाराजस्व अभियानातून जिल्ह्यात लोकसेवेचा जागर
कोल्हापूर :
प्रशासनाच्या कामामध्ये लोकाभिमुखता, गतीमानता, पारदर्शीपणा, सुसुत्रता, सुलभता येण्यासाठी व नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आणि महसूलवाढीच्या दृष्टीने सर्व सामान्य नागरिक व शेतक-यांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित महाराजस्व अभियान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात शासनाच्या विविध विभागाच्या प्रत्येक स्तरावरील कार्यालयाशी नियमित संबंध येतो. तलाठी /ग्रामसेवक/कृषि सहाय्यक ते विविध प्रशासकीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयांना वारंवार भेटी दिल्या जातात. ग्रामपातळीवर/क्षेत्रीयस्तरावर गावभेटी व दौ-या दरम्यान सामाजिक, भौगालिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग पाहता वेगवेगळ्या स्तरावर नागरिक, शेतकरी यांची असंख्य प्रकरणे व कामे प्रलंबित आहेत. नागरिक/शेतकरी यांचे अज्ञान, प्रचलित कायदे, अधिनियम, शासन निर्णय, परिपत्रक याबाबत क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी अधिकारी यांचे अनभिज्ञता यामुळे नागरिक / शेतकरी यांचे विविध प्रश्न अनादी कालापासून प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यातील 76 महसूल मंडळातील 173 ठिकाणी अशा शिबरांचे आयोजन केले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात तहसिल कार्यालय व इतर प्रशासकीय विभागांमार्फत 15 शिबीरे संपन्न झाली आहेत. तहसिल कार्यालय व अन्य प्रशासकीय विभागाचे तालुकास्तरीय प्रमुख यांच्या उपस्थितीत शिबीरे पार पडली आहेत. त्यामध्ये नागरीकांना दिलेल्या विविध लाभाबाबतचा महसूल विभाग आणि इतर प्रशासकीय कार्यालयांतर्फे अर्ज मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांकडून प्राप्त अर्जावर शासनाच्या सर्व विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली.
त्यानुसार विभागनिहाय निर्गत केलेल्या अर्जांची संख्या पुढील प्रमाणे आहे. महसूल विभाग- १३ हजार २६३, पशुधन विकास विभाग -१ हजार ७६१, वैद्यकीय विभाग ६ हजार ८८, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग – २५०, महाराष्ट्र राज्य विद्युत विरतण विभाग १२९, सामाजिक वनीकरण विभाग-३३०, कृषी विभाग ८२४, पंचायत समिती कार्यालय ९८१, वन विभाग – ७९, पाटबंधारे विभाग-८०, माहिला व बालविकास विभाग ७२६, उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय ७ हजार १९९, इतर संकिर्ण- ३ हजार ७४३, एकुण एकंदर -३२ हजार ५५१ आहेत.
नागरिकांना प्रशासनाच्या विविध विभागांची कामे, योजनांचा लाभ मिळाला आहे. यापुढेही सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व शिबीरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.