नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला
टोकियो :
ऑलिम्पिकमध्ये भारताची १०० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारताने अॅथलेटिक्समध्ये प्रथमच पदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय आहे. नीरज चोप्राच्या या करिश्माई कामगिरीनंतर संपूर्ण देश त्याला सलाम करत आहे. पंतप्रधान मोदी, देशाचे राष्ट्रपती, प्रत्येकजण नीरज चोप्राचे अभिनंदन करत आहे. क्रिकेट विश्वातूनही नीरजचे अभिनंदन होत आहे. नीरज चोप्राच्या विजयावर सुनील गावस्कर यांनी इंग्लंडमध्ये जिलबीचे वाटप केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत समालोचन करताना गावस्करांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. सामन्यादरम्यान, नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळतानाचा सोहळा प्रसारित करण्यात आला. हे पाहून सुनील गावस्करांच्या आनंदाला सीमा उरली नाही. ‘मेरे देश की धरती’ हे गाणे गात ते नाचतानाही दिसले. यासोबतच त्यांनी स्टुडिओमध्ये जिलब्यांचे वाटपही केले.
वीरेंद्र सेहवागनेही सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राला सलाम केला. ”हा खेळाडू रॉकेट आहे. हे सोने आहे आणि लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. असे दिवस सहजासहजी येत नाहीत. अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक जिंकणारा पहिला भारतीय. नीरज चोप्रा तू चॅम्पियन आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. खूप आनंद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे सेहवागने म्हटले.
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही नीरज चोप्राचे अभिनंदन केले. सचिनने म्हटले, ”नीरजने भाल्याला सूर्यापर्यंत पोहोचवले. नीरजमुळे आज भारत अधिक चमकत आहे.”