फोटो संग्रहीत

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा हा पूर प्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होते. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाने पूर परिस्थितीत आरोग्य सेवा पुरविण्याचे व पूर ओसरल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीचे सुक्ष्म नियोजन केले आहे. पूर परिस्थितीत आवश्यक उपाय योजना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या असून आरोग्य विभाग आतापासूनच दक्ष झाला आहे.

आरोग्य विभागाने यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थितीबरोबरच साथरोग नियंत्रणासाठी काटेकोर नियोजन केले आहे. 5 सामान्य/उपजिल्हा रुग्णालये, 18 ग्रामीण रुग्णालये, 76 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 416 उपकेंद्रामार्फत एक हजार 25 ग्रापंचायती व 1 हजार 225 गावातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 36 रग्णवाहिका (108 क्रमांक) (सामान्य रुगणालय/उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय/प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र) आणि 76 रुग्णवाहिका (102- क्रमांक) (यामध्ये विंगर-35, फोर्स-10, फोर्स ट्रक्स-1, बलेरो-1 आणि टाटा सुमो-29 चा समावेश) आरोग्य विभागाच्या दिमतीला सज्ज आहेत.

पुरेसा औषध साठा….
साथरोग प्रतिबंधासाठी आणि संभाव्य पूर परिस्थिती मध्ये छावण्यांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. पुरामुळे बाधित होणाऱ्या गावामध्ये निवारा (छावणी) मध्ये आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आली आहे. छावण्याव्यतीरिक्त 267 पूरबाधित गावांमध्ये ट्रान्झिट आरोग्य पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पंचायत समिती हातकणंगले, शिरोळ, उपकेंद्र घोसरवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठेगुलंद व सर्व तालुका अधिकारी कार्यालयामध्ये औषधांचा साठा (बफर स्टॉक) करण्यात येत आहे. पूरबाधित होणाऱ्या गावात रुग्णवाहिकेची सुविधा, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी मेडीक्लोर, क्लोरीन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक गोळ्यांचेही वाटप करण्याचे नियोजन केले आहे. तर पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी 76 आरोग्य केंद्रे व 416 उपकेंद्रांमध्ये 492 क्लोरोस्कोप आणि 22 हजार 800 लिटर मेडीक्लोर उपलब्ध करण्यात येत आहे. सर्पदंशासह इतर सर्व अत्यावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात संस्था स्तरावर उपलब्ध करुन ठेवली आहेत.

पिण्याच्या पाण्याचे टँकरचे शुद्धीकरण, निवारा (छावणी) मध्ये स्थलांतरीत होणाऱ्या सर्व महिला/किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्याचे नियोजित आहे. कोविड-19 प्रतिबंधासाठी सॅनिटायझर, मास्क, ग्लोज याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवला असून निवारा (छावणी) मध्ये स्थलांतरित होणाऱ्या नागरीकांची रॅपिड ॲन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. संभाव्य कोविड 4 लाटेच्या अनुषंगाने निवाऱ्याची (छावणी) व विलगीकरण कक्ष यांची वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन त्याचे सनियंत्रण व प्रमुख म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत जिल्ह्यातील सुमारे 391 पूर बाधित होणाऱ्या गावातील 44 हजार 706 कुटुंबातील 1 लाख 94 हजार 464 लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कोटेकोर नियोजन केले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील 41 गावातील 14 हजार 339 कुटुंबातील 61 हजार 456 लोकसंख्येला, हातकणंगले तालुक्यातील 19 गावातील 12 हजार 375 कुटुंबातील 55 हजार 237 लोकसंख्येला, पन्हाळा तालुक्यातील 56 गावातील 2 हजार 933 कुटुंबातील 13 हजार 985 लोकसंख्येला, चंदगड तालुक्यातील 28 गावातील 389 कुटुंबातील 1 हजार 589 लोकसंख्येला, कागल तालुक्यातील 41 गावातील 2 हजार 391 कुटुंबातील 10 हजार 812 लोकसंख्येला, शाहूवाडी तालुक्यातील 39 गावातील 1 हजार 1 कुटुंबातील 4 हजार 203 लोकसंख्येला, भुदरगड तालुक्यातील 27 गावातील 408 कुटुंबातील 1 हजार 704 लोकसंख्येला, राधानगरी तालुक्यातील 26 गावातील 214 कुटुंबातील 975 लोकसंख्येला, गडहिंग्लज तालुक्यातील 23 गावातील 1 हजार 743 कुटुंबातील 7 हजार 675 लोकसंख्येला, गगनबावडा तालुक्यातील 23 गावातील 300 कुटुंबातील 1 हजार 274 लोकसंख्येला, आजरा तालुक्यातील 13 गावातील 88 कुटुंबातील 360 लोकसंख्येला आणि करवीर तालुक्यातील 55 गावातील 7 हजार 704 कुटुंबातील 32 हजार 700 लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
आरोग्य पथके व ट्रान्झिट पथके
संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या 391 गावामध्ये 124 आरोग्य पथके (छावणी) व 267 ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. यामध्ये शिरोळ तालुक्यात 37 आरोग्य पथके व 4 ट्रान्झिट पथके, हातकणंगले-16 आरोग्य व 3 ट्रान्झिट, पन्हाळा- 14 आरोग्य व 42 ट्रान्झिट, चंदगड- 1 आरोग्य व 27 ट्रान्झिट, कागल – 10 आरोग्य व 31 ट्रान्झिट, शाहुवाडी – 7 आरोग्य व 32 ट्रान्झिट, भुदरगड- 4 आरोग्य व 23 ट्रान्झिट, राधानगरी – 4 आरोग्य व 22 ट्रान्झिट, गडहिंग्लज -5आरोग्य व 18 ट्रान्झिट, गगनबावडा 1 आरोग्य व 22 ट्रान्झिट, आजरा 1 आरोग्य व 12 ट्रान्झिट आणि करवीर तालुक्यात 24 आरोग्य व 31 ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत.

24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत….
जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे व्हीसीद्वारे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. संभाव्य पूर बाधित गावात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी खासगी डॉक्टर, परिचारिका यांचा सहभाग घेण्यात येणार असून पुरेशा प्रमाणात औषधसाठा व किटची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. जिल्हा हितवाप अधिकारी कार्यालयात 20 फॉगिंग मशीन, नगरपरिषदांकडे 23, महापालिका-15, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी 99 आणि ग्रामपंचायतीमध्ये 127 असे 284 फॉगिंग मशीन उपलब्ध आहेत.

गरोदर मातांची विशेष काळजी…
जून ते सप्टेंबर 2022 या कालावधीत प्रसुती होणाऱ्या सुमारे 5 हजार 716 गरोदर मातांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यामध्ये जून मध्ये 1 हजार 425, जुलै मध्ये 1 हजार 440, ऑगस्ट मध्ये 1 हजार 1 आणि सप्टेंबर मध्ये 1 हजार 450 गरोदर मातांचा समावेश आहे. प्रसुतीपूर्वी 8 दिवस अगोदर नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा मातांना दाखल करणे, मातेसह एका नातेवाईकाची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार असून सर्व आरोग्य संस्थेच्या ठिकाणी प्रसुतीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
पूर परिस्थिती उद्भवल्यास पूर ओसरल्यानंतर साथरोग प्रतिबंध व रोगराई पसरू नये म्हणून उपाय योजना करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागात ताप, जुलाब, व कोविडच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन सर्व्हेक्षण, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे दैनंदिन शुद्धीकरण, परिसर, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, कीटकजन्य आजार नियंत्रण, पूर ओसल्यानंतर धुरळणी (डस्टिंग) मॅलेथियॉन ५ टक्के पावडर फॉगिंग मशिन लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहे.
एकंदरीत संभाव्य पूर परिस्थितीमध्ये आणि पावसाळ्यात साथरोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने नेटके नियोजन केले असून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे.
एकनाथ पोवार माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!