दुर्गराज रायगड: शिवराज्याभिषेक सोहळा बनणार ‘लोकोत्सव’ : ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आवाहन
कोल्हापूर : ‘राज्याभिषेक’ शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान. यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणार हा क्षण. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली. दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला ‘राज्याभिषेक’ झाला. मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला अन् सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही दाहीदिशा फिरली. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी, या हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक घटनेस ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२४ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
यंदा गडावर पाच जूनला सायंकाळी पाच वाजता ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्राची पारंपरिक युद्धकला कशी असते, याचे दर्शन गडावर येणाऱ्या तमाम देशवासियांना व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पट्टा, तलवार, भाला, विटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गदका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी सात वाजता राज दरबार येथे ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहीरी कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.
त्याचबरोबर ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याभिषेकाची सोहळ्याची रुपरेषा :
दि. ५ जून २०२४ :
दु. ३ : ३० वा. राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी जिजाऊ यांना अभिवादन करुन शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ
(स्थळ – जिजाऊ समाधी, पाचाड)
सायं. ४.०० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या
समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ. (स्थळ : नाणे दरवाजा)
सायं ४. ३० वा. महादरवाजा पूजन व तोरण बांधणे.
सायं ५. ०० वा. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपूजन व २१ गावातील सरपंच व पंचक्रोशीतील
गावक-यांची उपस्थिती. ( स्थळ : नगारखाना)
सायं ५. ०० वा. ‘धार तलवारीची… युद्धकला महाराष्ट्राची’ शिवकालीन युद्धकलांची मानवंदना. (स्थळ : होळीचा माळ)
सायं. ७ : १५ वा. आतषबाजी
रात्री ८. ०० वा. ‘जागर शिवशाहीरांचा…स्वराज्याच्या इतिहासाचा’ (स्थळ : राजसदर)
रात्री ९. ०० वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. (स्थळ : शिरकाई मंदिर)
रात्री ९. ३० वा. जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून किर्तन व भजन. (स्थळ : जगदीश्वर मंदिर)
दि . ६ जून २०२४ :
स. ७.०० वा. रणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन, ध्वजारोहन
( स्थळ : नगारखाना)
स. ७.३० वा. शाहिरी कार्यक्रम. (स्थळ : राजसदर)
स. ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन. (स्थळ : राजसदर)
स. ९.५० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत
व राजसदरेवर आगमन
स. १०.१० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक
स. १०.२० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
स. १०.३० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन
स. ११.०० वा. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ युवराज संभाजी छत्रपती महाराज व सर्व शिवभक्तांच्या
समवेत जगदीश्वराच्या दर्शनासाठी श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे प्रस्थान.
दु. १२.०० वा. जगदीश्वर मंदिर दर्शन
दु. १२.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन !
—————————————————-
सदर पत्रकार परिषदेस अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, कार्याध्यक्ष हेमंत साळुंखे, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी, समितीचे माजी अध्यक्ष. फत्तेसिंह सावंत, आरोग्य कमिटीचे उदय घोरपडे, धार तलवारीची..युद्धकला महाराष्ट्राची या शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ कमिटीचे प्रवीण उबाळे, शाहीर कमिटीचे दिलीप सावंत, सचिव अमर पाटील,समितीचे प्रसन्न मोहिते, अजयसिंह पाटील, धनाजी खोत, दीपक सपाटे, अनुप महाजन, रणजीत पाटील, सुशांत तांबेकर, श्रीकांत शिरोळे, पूनम गायकवाड पाटील आदी उपस्थित होते