शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी उद्या रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक : संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर :
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगड येथे होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त पूर्व नियोजनासाठी रविवारी (ता. १९) राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे सायंकाळी पाच वाजता बैठकीस सुरुवात होईल.
समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे.
यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असून, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा दिमाखात साजरा केला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश-परदेशातून शिवभक्त सोहळ्यास हजेरी लावणार आहेत. तसेच शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी, लेझीम, ढोल ताशा, धनगरी ढोल, पालखी सोहळा आकर्षण असणार आहेत.
हा सोहळा भव्यदिव्य अशा पद्धतीने साजरा होणार असल्याने या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. तरी या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.