सकारात्मक : जिल्हयात कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही
कोल्हापूर :
गेली अनेक दिवस कोरोना परिस्थितीमुळे त्रस्त असलेल्या कोल्हापूरवासियांना आणि पर्यायाने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे . जिल्ह्यात आज प्रथमच कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही समाधानाची बाब आहे .
४० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात सध्या केवळ १४२८ इतके कोरोनाचे रूग्ण सक्रीय असून रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९६ .५० टक्के इतका असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडासा कमी झाला आहे. गेली अनेक दिवस कोरोनामुळे रुग्ण मृत्यूचे प्रमाण आणि रुग्ण संख्या आटोक्यात यावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा या कामी लावली होती . त्याचेच फलित म्हणून आज कोरानामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही .
कोरोना परिस्थितीमुळे कधी काळी राज्यात अव्वल ठरलेल्या या जिल्ह्याने कोरोनाला हरविण्यासाठी नियोजनबध्दरित्या प्रयत्न केले . जिल्हा प्रशासन , मनपा आणि आरोग्य यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज कोल्हापूरला दिलासा मिळाला मात्र यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये .
वैद्यकीय तज्ज्ञांनी येत्या १५ ऑक्टोंबरपर्यंत तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे .त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही . त्यामुळे नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग , मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा . सध्या सणासुदीचे दिवस असल्याकारणाने जनतेने बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी करू नये, विनाकारण बाहेर फिरणे टाळावे असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले .