जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर :

जिल्ह्यात प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टरांची एक सर्वसमावेशक यादी आरोग्य विभागाने तयार करावी. प्रत्येक गावातील डॉक्टरने संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात तर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेकडे तसेच महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आरोग्य विभागाकडे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्रे त्वरित सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास देशमुख, डॉ. लांब, डॉ. फारुख देसाई आदि उपस्थित होते.


      आरोग्य विभागाने पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची सर्वसमावेशक एक यादी तयार करून ह्या यादीतील डॉक्टर्सनी दिलेली कागदपत्रे अधिकृत आहेत का नाहीत त्याबाबतची तपासणी मोहीम राबवावी. त्याप्रमाणेच यादी व्यतिरिक्त असलेल्या डॉक्टरकडे अधिकृत कागदपत्रे नसतील तर त्यांच्यावर इंडियन पिनल कोड, मेडिकल प्रोहिबिशन ऍक्ट, नर्शिंग ऍक्टनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले.

      यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत सजगपणे बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवावी व त्यांची कागदपत्रे तपासणी करून अनाधिकृतपणे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत. तसेच अशा बोगस डॉक्टर कडे काम करणारे कर्मचारी तसेच त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषधी देणाऱ्या औषधी दुकानदारासह आरोपी करावे. यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्यासाठी सर्व संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात केलेले आहे. तरी, या शोध मोहिमेत आपल्या कार्यक्षेत्रात एक ही बोगस डॉक्टर राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी, असे निर्देश श्री. रेखावार यांनी दिले.

      या बोगस डॉक्टर शोध मोहिमेत सर्व संबंधित तहसीलदार यांनीही तालुकास्तरीय समितीला सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच, बोगस डॉक्टर वर कारवाई करत असताना बीडीओनी सोबत जावे तर पोलिस विभागाने त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, आशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. संबंधित डॉक्टर कडे मूळ कागदपत्रे नसतील तर ते मूळ कागदपत्रे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची असून प्रशासकीय यंत्रणेची नाही, त्यामुळे ज्याच्याकडे स्वतःचे मूळ कागदपत्रे नसतील तो डॉक्टर बोगस आहे, असे गृहीत धरावे असेही श्री. रेखावार यांनी सूचित केले.


   अधिकृत विद्यापीठाची पदवी नसणे तसेच बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली नोंदणी नसलेले डॉक्टर हे बोगस डॉक्टर असल्याची माहिती डॉ. लांब यांनी दिली. आयुर्वेदिक, होमियोपॅथी, डेंटल व ऑलोपॅथी डॉक्टरांना वैद्यकीय पदवी व अधिकृत नोंदणी आवश्यक आहे. तसेच, जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत बोगस डॉक्टर बाबतच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राधानगरी, करवीर व भुदरगड या तीन तालुक्यातून प्रत्येकी एक तक्रार प्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!