छत्रपती शाहूं महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांनी पारित केलेले
आदेश यांच्या प्रदर्शनाचे – खा . शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन
कोल्हापूर :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनाने १८ एप्रिलपासून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे .त्याचाच एक भाग म्हणून २३ एप्रिल रोजी शाहू मिल येथे छ.शाहूं महाराजांची दुर्मिळ छायचित्रे , त्यांनी वेळोवेळी काढलेले लोकोपयोगी आदेश, आणि कायदा कागदपत्रे आदींच्या प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या हस्ते तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले .
शाहू मिलच्या परिसरात भरलेल्या या आगळ्या – वेगळ्या प्रदर्शनात शाहू महाराजांच्या इ. स.१८९४ – ते १९२२ या २८ वर्षांच्या दैदिप्यमान राज्य कारभाराचा कालखंड या प्रदर्शनातून शाहू प्रेमींसाठी पाहायला मिळणार आहे.या प्रदर्शनाचे खा .पवार यांनी मनःपूर्वक कौतुक करुन या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या .

यावेळी कोल्हापूर मनपाच्यावतीने शाहू मिल येथे प्रस्तावित शाहू स्मारकाचे दृष्य प्रणालीद्वारे सादरीकरण करण्यात आले .वस्त्रोद्योग महामंडळाकडून सदरची जागा हस्तांतरीत झाल्यानंतर ही जागा मनपा विकसित करणार आहे .
ज्याप्रमाणे संशोधन ग्रंथ,दर्जेदार लेख कादंबऱ्यामुळे एखाद्या ऐतिहासिक चारित्र्यावर प्रकाश पडतो ,तद्वत छायाचित्रांच्या माध्यमातून एखादे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे समोर येणार असून स्मृती शताब्दी पर्वानिमित्त आयोजित केलेले हे चित्रमय प्रदर्शन जनतेसाठी आदरयुक्त व आकर्षणाचा विषय ठरणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 200 हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे .
सदर प्रदर्शनामध्ये शाहूंच्या राजकीय ,सामाजिक जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे ,शाहूंचे राज्यरोहण,कौटुंबिक ,परदेश दौरा, शिकारीची तसेच शाहूकालीन इतर छायाचित्रे, यासह २८ वर्षाच्या कालखंडात शाहूंनी वेळोवेळी जनहितार्थ केलेल्या सुमारे १ लाख आदेशातील निवडक आदेश ,कायदे , कागदपत्रे व इतर पत्र व्यवहार शाहू व इतिहास प्रेमींना पहावयास मिळेल .
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आ.अरुण लाड, आ.जयंत आसगावकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा अधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, प्रदर्शनकार इंद्रजीत सावंत, वसंत मुळक , अमरजा निंबाळकर, प्रवीण गायकवाड .अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदित्य कोठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना ……
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एकाच छताखाली हे सर्व कलाकार एकत्र आले .कधी काळी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबुराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. या मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून ‘ कोल्हापूर स्कूल ‘अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केली .या कलेचा जागर अखंडीत ठेवण्याच्या उद्देशाने हे सर्व कलाकार शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी ऐतिहासीक शाहू मिलमध्ये एकत्र आले होते.
यामध्ये १३०हून अधिक जेष्ठ व नामवंत चित्रकार / शिल्पकार सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रवीण गायकवाड , शिरीष बिवलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
नागरिकांना ही प्रात्यक्षिके तब्बल ४ दिवस पाहता येतील .या उपक्रमासाठी कॅमल कंपनीने सहकार्य केले असून सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने मोफत उपलब्ध करून दिले आहे.
दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट,कला निकेतन कला महाविद्यालय, कला मंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंग बहार, कलासाधना यांच्यासह परिसरातील इतर चित्रकार, शिल्पकार आदींच्या उत्स्फुर्त सहभागातून हा उपक्रम संपन्न झाला.
या उपक्रमानंतर नागरिकांसाठी या चित्राचे प्रदर्शन , ‘ कृतज्ञता पर्वात ‘ शाहू मिल परिसरात होणार आहे. याप्रसंगी नंदकुमार गायकवाड , जयप्रकाश ताजणे दिलीप घेवारी , सिद्धार्थ लांडगे , रंजित चौगुले , इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते .
क्षणचित्रे : –
शाहू मिल परिसराच्या ऑडीटोरियम हॉलमध्ये सकाळी ९ पासून चित्रकार /शिल्पकारांची गर्दी
आपल्या चित्र /शिल्प कलेद्वारे लोक नायकाला आदरांजली वाहण्यासाठी सहभागी कलावंतांमध्ये अपूर्व उत्साह .
वयाची 85 वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि अभिजात चित्रकलेमध्ये PHD मिळवणाऱ्या डॉ .नलिनी भागवत यांचा या चित्रकला प्रदर्शनामध्ये उत्स्फूर्त सहभाग .
वयाची केवळ ६ वर्ष पूर्ण असणाऱ्या यज्ञेश किरण टाकळकर या बालकाच्या चित्राचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक .
शाडू कामाद्वारे बनविलेल्या शाहू महाराजांच्या प्रतिमांचे शिल्पकारांकडून प्रेक्षकांना मनोहारी दर्शन .