करोनामुळे राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे २५ हजार मुले शिक्षणापासून वंचित राहिली
मुंबई. :
करोनामुळे राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे २५ हजार मुले शिक्षणापासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकारानुसार या सर्व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मोहीम राबविणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी दिली.
या काळात स्थलांतराचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरक्षक’ अॅपची निर्मिती करण्यात आली होती. त्याच्या आधारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे आढळून आले आहे.
सर्वेक्षणानुसार वर्षभरात कधीच शाळेत न गेलेल्या ६ ते १४ वयोगटातील बालकांची संख्या सात हजार ८०६ होती. त्यामध्ये तीन हजार ७३० मुलींचा समावेश होता. तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या १७ हजार ३९७ होती. यामध्ये आठ हजार ३८९ इतक्या मुली आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.