सुधारित सूचना : प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्याबाबत सुधारित सूचना
कोल्हापूर :
जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून दि. 7 ऑक्टोबर 2021 पासून खुली करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधित विश्वस्त / मंडळ / अधिकारी यांनी निर्णय घ्यावयाचा आहे. मास्क परिधान करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सर्व सबंधित प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्याकडून परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या- त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी / कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहेत.
यापूर्वी कोविड -19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारीरिक अंतराचे व संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.
परिशिष्ट अ
धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी होणारा कोविड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना
1) पार्श्वभूमी –
धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया संख्येने लोक एकत्र येत असतात. अशा ठिकाणी / ठिकाणांच्या आवारात कोविड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर / इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे.
2) व्याप्ती –
या आदेशामध्ये कोविड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायांसोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचाही समावेश करण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे सुरू करण्यास परवानगी असेल.
3) सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना –
65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहावे. धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड -19 विषाणू संसर्गाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार / सेवेकरी / अभ्यागत / भाविक यांच्याकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे.
यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल.
I) या सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतो वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरीक अंतर राखणे आवश्यक असेल.
II) चेहरापट्टी / मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल.
III) हात अस्वच्छ नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे ( किमान – 40 ते 60 सेंकदापर्यत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोलयुक्त हॅण्ड सॅनिटायझरचा वापर ( किमान 20 सेंकदापर्यत) करावा.
IV) श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेला टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
V) या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक / कामगार / भाविक / सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासन / जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे.
VI) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघंन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.
VII) धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.
4) सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी खालील प्रमाणे उपाययोजना करतील.
I) सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल.
II) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.
III) सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी / मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. (No Mask – No Entry)
IV) सर्व धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोविड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्सच्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोविड -19 विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या /प्रसारित केल्या जाव्यात.
V) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देण्याबाबत अभ्यागत / भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे. त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा, याबाबतचा निर्णय धार्मिक / प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त / मंडळ / अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे.
VI) चप्पल / बुट / पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवण्याबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक / कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत.
VII) वाहन पार्किगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.
VIII) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवाराबाहेरील सर्व दुकाने / स्टॉल / कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळ सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल.
IX) धार्मिक / प्रार्थना स्थंळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी योग्य मार्किग करावे.
X) भाविक / अभ्यागतासांठी धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे.
XI) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या / अभ्यागतांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान 6 फुटाचे शारिरीक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे. यासाठी धार्मिक / प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल.
XII) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने धुवावेत.
XIII) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत / भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकुल यंत्र / वायुविजनसाठी CPWD च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान 240 C ते 300 C पर्यत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता 40-70 % पर्यत असेल. शक्यतोवर पुरेशी ताजी हवा, क्रॉस व्हेन्टीलेशन याची पुरेसी व्यवस्था करावी.
XIV) पुतळे/ मुर्ती/ पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही.
XV) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी असणार नाही.
XVI) संसर्गाचा विचार करता शक्य त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले भक्ती संगीत / गाणी वाजविली जावीत.परंतु कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येवू नये.
XVII) एकमेकांना अभिवादन करताना शारीरिक संपर्क टाळण्यात यावा.
XVIII) धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई / जमखाना वापर करण्यास परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील.
XIX) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या आतमध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरीक अर्पणांना परवानगी असणार नाही.
XX) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे.
XXI) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकाव्दारे या परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जंतुकीकरण केले जावे.
XXII) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमीन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी.
XXIII) अभ्यागत / भाविक / सेवेकरी / कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे याची दक्षता घेण्यात यावी.
XXIV) धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी / सेवेकरी यांना कोविड -19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्याचबरोबर कामावर येण्या अगोदर तसेच आठवडयातून एकदा कोविड -19 चाचणी करणे आवश्यक असेल.
XXV) खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक असेल.
XXVI) प्रत्येक धार्मिक / प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधित पोलिस अधिक्षक / जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
XXVII) आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
a) आजारी व्यक्तीला इतरांपासून दूर असे स्वंतत्र खोलीत किंवा जागेत ठेवावे.
b) डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क / चेहरा पट्टी वापर करणे बंधनकारक असेल.
c) तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल/ क्लिनिक) केंद्रात कळवावे. तसेच स्थानिक / जिल्हा प्रशासनास कळवावे.
d) नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा RRT, उपचार करणारे तज्ञ) रुग्णाबाबत जोखीम मूल्याकंन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.
e) रुग्ण कोविड -19 विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) आल्यास सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा.