शिरोली दुमालाचे नूतन ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील यांची स्नेह जपणारी भाऊबीज
करवीर :
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधील विजयी नूतन ग्रामपंचायत सदस्य सूरज नारायण पाटील यांनी आपल्या प्रभागातील महिलांना भाऊबिजेला आमंत्रित करून हळदी कुंकू कार्यक्रम होऊन साडी भेट दिली. नवीनच निवड झालेल्या या तरुण ग्रामपंचायत सदस्यांने प्रभागातील महिलांप्रति भाऊबिजेच्या निमित्ताने जपलेला स्नेह वेगळेपण दाखवून देत आहे.
सूरज पाटील हे शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे आजोबा बाबुराव पुंडलिक पाटील यांनी तब्बल २२ वर्षे गावचे सरपंच पद भूषविले होते. आजोबांच्या कारकिर्दीनंतर जवळपास ४० वर्षानंतर नातू सुरज यांचा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून प्रवेश झाला आहे. या निवडीचे औचित्य साधून भाऊबिजेनिमित्त प्रभागातील २०० महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकशाही ग्रामविकास आघाडीच्या विजयी सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य सूरज नारायण पाटील म्हणाले, प्रभागातील ग्रामस्थ, माहिलांनी ज्या आपलेपणाने निवडून दिले तो जिव्हाळा कायमस्वरूपी राहावा, भावा – बहिणीचे नाते असेच राहावे यासाठी हा स्नेह जपला आहे.
कार्यक्रमास तुळशी समूहाचे नेते माजी उपसरपंच सरदार पाटील, शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील, गजानन सुभेदार, रामचंद्र पाटील, दिलीप देशमुख, बजरंग कांबळे, लोकशाही ग्रामविकास आघाडीचे विजयी सदस्य, महिला उपस्थित होत्या.