शेतमालाला दिडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचा केंद्राला विसर : राजू शेट्टी यांची टीका
( दोनवडे येथे सभा )
करवीर :
सध्या खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर कमी होऊनही केंद्रातील मोदी सरकारने खतावरील अनुदान कमी केलेले नाही. त्यामुळे ९०० रुपयेला मिळणारे डीएपीचे पोते १७०० रुपयेला शेतकऱ्यांना खरेदी करावे लागते. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन शेती तोट्याची बनू लागली आहे.शेतीमालाला दिडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचा केंद्राला विसर पडला असून मोदींनी विश्वासघात केल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियान व साखर आयुक्तालयावर काढण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात
दोनवडे (ता. करवीर) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महादेव कळके हे होते.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, सर्वच सत्ताधारी पक्षानी शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव देण्याऐवजी लुटण्याचे काम केले. शरद पवारांनी कारखानदारांच्या फायद्यासाठी एफआरपी घटवण्यासाठी पायाभूत साखर उतारा बदलाचा घाट सर्वप्रथम शरद पवार यांनी केला. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठीच स्वाभिमानी संघटना यासाठीच रस्त्यावर उतरते आणि सरकार धारेवर धरते. एनडीए व इंडिया या दोन्ही पक्षांच्यावर शेतकरी विरोधी धोरण राबवत आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणासोबत जाण्यास इच्छुक नाही.
आम्ही मागील हंगामातील ४०० रूपये व या हंगामात डिजिटल काटे केल्याशिवाय हंगाम सुरू करु देणार नाही यासाठी साखर आयुक्तावर मोर्चा आयोजित केल्याचे सांगितले.
सभेत प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, बाजीराव देवाळकर, रामभाऊ चेचर यांची भाषणे झाली. यावेळी ज्येष्ठ शेतकरी दादू कामिरे यांचेसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार यशवंत पाटील यांनी मानले.