सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली
करवीर :
मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी वाढल्याने सोनाळी (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली गेले आहे. यात ग्रामपंचायतीचे दफ्तर, संगणक , सर्व फर्निचर पाण्यात भिजून गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पाणी धोक्याच्या बाहेर गेले आहे. अनेक गावात ओढे फुटून पाणी वाहू लागले आहे. सोनाळी येथे आज गुरुवारी ओढ्याचे पाणी थेट ग्रामपंचायत कार्यालयातच शिरले.त्यामुळे कार्यालयातील साहित्य मोठ्या प्रमाणात भिजून गेले आहे. काँप्युटर पाण्यात बुडून गेली आहेत. फर्निचर, खुर्च्या, टेबल पाण्याखाली गेले आहेत.
आज सकाळी सरपंच मोहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी पुराच्या पाण्यात जाऊन शक्य होईल तेवढी साहित्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामपंचायत कार्यालयाजवळच असणारी विद्युत ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) असून तिलाही पाण्याने बुडून पेटी पाण्याखाली गेली आहे. ही डीपीची जागा बदलून दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणीही महावितरणकडे वारंवार करण्यात येत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
यावेळी सरपंच मोहन पाटील म्हणाले, ग्रामपंचायत कार्यालयाला पावसाळ्यात गेली दोन तीन वर्षे फटका बसत आहे. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी वाढून कार्यालय पूर्ण बुडाले आहे. मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय नवीन सुरक्षित ठिकाणी बांधण्यासाठी शासन स्तरावरून आम्हाला निधी उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली.