येत्या ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन येत आहे. याबाबत विविध विषयांसंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली.
तसेच, दुर्गराज रायगडवर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने जी कामे सुरू केलेली आहेत व प्रलंबित आहेत, ती ६ जूनच्या पूर्वी तात्काळ पूर्ण करावीत याबाबत भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांचीही संभाजीराजे यांनी भेट घेऊन रीतसर निवेदन दिले. यामध्ये मुख्यत्वे राजसदर संवर्धन कार्याचा समावेश आहे.
३५० व्या शिवराज्याभिषेक महोत्सव निमित्त रायगडच्या नगारखाना वास्तूचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने नगारखान्यास पूर्वी होते त्या पद्धतीचे ऐतिहासिक छत बसवावे, अशी मागणी यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी केली. नगारखान्यावर पूर्वी छत अस्तित्वात होते, याबाबतचे वास्तू अवशेषात्मक पुरावे देखील यावेळी सांस्कृतिक मंत्री व पुरातत्व विभागास त्यांनी सादर केले.
याविषयी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणजे की, पावसाळ्यात नगारखान्यास मोठ्या प्रमाणात गळती लागते. यामुळे या वास्तूस धोका पोहोचत असून याचे ऐतिहासिक बांधकाम कमकुवत होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नगारखान्यास छत बसविल्यास बांधकामातून होणारी गळती थांबवून आपण या वास्तूचे संवर्धन करू शकू शिवाय नगारखान्याला त्याचे ऐतिहासिक शिवकालीन स्वरूप देखील परत प्राप्त होईल.
या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षात हे काम सुरू होऊन ते पूर्ण व्हावे, यासाठी मी पूर्णतः प्रयत्न सुरू केलेले असून सर्व स्तरांवर त्यासाठी पाठपुरावा करीत आहे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी केले. यासाठी तात्काळ स्वतः केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, रायगड विकास प्राधिकरण, सांस्कृतिक विभागांचे सचिव, पुरातत्व विभाग, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाचे संबंधित अधिकारी वर्ग यांची एकत्रित बैठक बोलवावी, अशीही मागणी केली. तसेच, मंत्री महोदयांना किल्ले रायगड भेटीस निमंत्रित केले. यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रायगडास भेट देण्यासह याविषयीची बैठक बोलावू अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री यांनी दिली.