जिल्ह्यात सूर्यफूल बियाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रश्न
Tim Global :
जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सूर्यफूल बियाणाचा तुटवडा आहे, जिल्ह्यात सुमारे शंभर हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी होईल असा अंदाज असून यासाठी ७० क्विंटल बियाणाची मागणी असताना एक किलो ही बियाणे उपलब्ध झालेले नाही. एकीकडे खाद्य तेलाचे दर भरमसाठ वाढत आहेत ,दुसरीकडे तेलबियाणे उपलब्ध होत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षापूर्वी बोगस सूर्यफूल बियाणांमुळे अनेक शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. यानंतर जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे ,मात्र आता खाद्य तेलाचे दर भरमसाठ वाढत आहेत,
सूर्यफूल तेलाचा दर २०० रुपये किलो च्या वरती गेला आहे, त्यामुळे शेतकरी नव्याने सूर्यफूल , व भुईमूग पीक घेण्यावर भर देत आहे.
जिल्ह्यात रब्बी, उन्हाळी आणि खरीप मधेही काही शेतकरी सूर्यफूल पीक घेतात. रब्बी हंगामात सुमारे ६० हेक्टर तर उन्हाळी हंगामात सुमारे शंभर हेक्टर सूर्यफूल पीक घेतले जाते. यासाठी सुमारे ७० क्विंटल बियाण्याची मागणी होत असते. आता मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यात १५ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सुर्यफूल बियाण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्यफुलाचे प्लॉट फेल गेले ,यामुळे बियाणाचा तुटवडा आहे अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली.आता
उन्हाळी हंगामात बियाणे उपलब्ध न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे. सध्या सर्वत्र उसाचे खोडवे व काढण्यात येणारे उसाचे पीकाच्या तोडण्या सुरू आहेत, यामुळे बियाणाची मागणी होत आहे.
गोपाळ खाडे ,शेतकरी सांगरुळ,
सतरा सदस्यांचे आमचे एकत्र कुटुंब आहे, नदीकाठचा ऊस गेल्यानंतर नेहमी सूर्यफूल एक एकर दोन एकर घेतले जाते,अजून बियाणे उपलब्ध झालेले नाही ,यामुळे हंगाम पुढे जाण्याची भीती आहे, कृषी खात्याने तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे.
ज्ञानदेव वाकुरे ,जिल्हा कृषी अधीक्षक, कंपनीशी संपर्क झाला आहे, पॅकेजिंग ला बियाणे गेले आहे ,दोन ते आठ तारखे दरम्यान उपलब्ध होईल.