साथ द्या, आजन्म तुमच्यासाठी उभा राहणार : सांगरुळ येथील सभेत राहुल पाटील भावुक (उपस्थित जनसमुदाय हळहळला, महिलांना हुंदके अनावर..)
कोल्हापूर :
तुमची वेळ आत्ताच नव्हे तर, करवीरची जनता कधीच येऊ देणार नाही. वेळ आपली आहे अशी टॅगलाईन वापरून निवडणूक लढविणाऱ्या विरोधी उमेदवाराची वेळ जनता कधीच येऊ देणार नाही. दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांना आपण जशी भरभरून साथ दिली तशीच साथ मला द्या, आजन्म तुमच्यासाठी उभा राहणार, असे अभिवचन सांगरुळ येथील विराट जाहीर सभेत देताना राहुल पी.पाटील भावुक झाले. यावेळी संपूर्ण जनसमुदाय हळहळला, महिलांना हुंदके अनावर झाले. अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार जयंत आसगावकर होते.
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, अडचणीच्या वेळी दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाचविला म्हणून आज जिल्ह्यात पक्ष टिकला. लोकसभेला शाहू महाराजांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करुया.
गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, सांगरूळ गावातील अतिक्रमणे नियमित करण्याची पहिली मागणी आमदार स्व. पी. एन.पाटील यांनी आपल्या कार्यकाळात शासनाकडे केली. विरोधक आत्ता वैफल्यग्रस्त झाल्यामुळे बेताल वक्तव्ये करत आहेत. आपल्या सर्वासाठी साहेबांनी ४० वर्षे वाहिली आहेत. आज त्यांच्या माघारी आपण सर्वजण ठामपणे राहून राहुल पाटील यांना आमदार करूया आणि साहेबांना श्रद्धांजली वाहूया, असे अंत: करणपूर्वक आवाहन केले.
आमदार जयंत आसगावकर, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब देवकर, दादू कामिरे, बाजीराव देवाळकर, प्रा.टी.एल.पाटील, बाजीराव खाडे, निवास सडोलीकर, प्रकाश मुगडे, कृष्णात चाबूक यांची भाषणे झाली. यावेळी गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील, विजय देवणे, सरपंच शीतल खाडे, पी.डी.धुंदरे, एम.आर.पाटील, अमर पाटील, निवृत्ती आबा चाबूक, शामराव सुर्यवंशी, सचिन पाटील, विष्णू पाटील, सीमा चाबूक, अर्चना खाडे, नंदकुमार पाटील, गुणाजी शेलार, ए.डी.माने, भगवान पाटील उपस्थित होते.
——————————–
संपूर्ण जनसमुदाय हळहळला, महिलांना हुंदके अनावर…
ज्या नेत्याने आयुष्याची ४० वर्षे जनसेवेसाठी वाहिली त्या स्व..पी.एन.पाटील साहेबांच्या निधनानंतरही त्यांच्यावर विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत, हे निंदनीय असल्याचे सांगताना राहुल पाटील यांना अश्रू अनावर होत होते, यावेळी उपस्थित जनसमुदायाने राहुल भैया, आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्हाला आमदार करणारच असे म्हणत ‘ स्व. पी.एन. पाटील साहेब अमर रहे ‘ च्या घोषणाचा गजर झाला. पाण्याने भरलेल्या डोळ्याने आणि तितक्याच धैर्याने राहुल पाटील यांच्या विजयाचा निर्धार केला. यावेळी उपस्थित महिलांना हुदके अनावर झाले.