गोकुळ आदर्श संघ , सत्ताधारी आघाडीला निवडून द्या : आमदार पी.एन.पाटील
शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथे राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारार्थ मेळावा
शाहूवाडी :

गोकुळ दूध संघ पारदर्शक कारभारामुळे राज्यात नंबर एक असा संघ आहे. सभासदांच्या जास्त दर देणारा एकमेव संघ आहे. दूध उत्पादकांच्या घरात गोकुळ नांदण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या पाठीशी राहा. विरोधकांनी खोटे आरोप करून निवडणुकीचा घाट घातला. पण गोकुळ हा आदर्श संघ आहे. त्यामुळे ठरावधारकांनी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला निवडून द्यावे, असे आवाहन आमदार पी.एन.पाटील यांनी केले.

गोकुळ निकडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या प्राचारार्थ शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मेळाव्यात आमदार पाटील म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार पी.एन.पाटील म्हणाले, जिल्ह्यात सत्ताधारी आघाडीला पाठिंबा वाढत आहे. गोकुळ टिकलं पाहिजे या भावनेतून ठरावधारकांचा सत्ताधारी आघाडीला वाढता पाठिंबा मिळत आहे. आमचे पॅनेल मोठ्या मताधिक्याने निवडणूक येणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. अडचणीच्या काळातही संघाने सभासदांना सगळ्यात जास्त दर दिला आहे. वारणा दूध संघ सहकारातून मल्टिस्टेट कधी झाला हे आमदार कोरेंनी स्पष्ट करावे, असे आव्हानही दिले.
शौमिका महाडिक यांनी यावेळी सप्तगंगा साखर कारखान्याचे नाव एका रात्रीत डी.वाय.पाटील कारखाना कसे काय झाले?, तेथील जुन्या साडेचार हजार सभासदांना का काढून टाकले? असे प्रश्न उपस्थित करून गोरगरिबांचा सीपीआर दवाखाना मोडीत काढणाऱ्यांनी स्वतःचा खाजगी मेडिकल उद्योग सुरू करून डोनेशन उकळले. स्वतः धनदांडगे आहात तर एखादा बंद पडलेला संघ चालवायला घेऊन गोकुळप्रमाणे वाढवून दाखवा, अशी टीका पालकमंत्री पाटील यांच्यावर केली.
प्रारंभी हंबीरराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी रणजितसिंह पाटील, विजय पाटील उत्रेकर , प्रताप पाटील कावणेकर यांनी भाषणे केली. मेळाव्यात आघाडीचे उमेदवार, ठरावधारक उपस्थित होते.