आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे सहविचार सभा संपन्न
सातारा :
आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे यांच्यासह प्राथमिक माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, वेतन पथक अधीक्षक उपस्थित होते.
सुरवातीला उपसंचालक चोथे आणि शिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक व माध्यमिक विभागातील वैद्यकीय बिले, थकीत वेतन, मुख्याध्यापक मान्यता या प्रकरणाची एकूण प्रलंबित कामे आणि निर्गमित झालेल्या कामांची माहिती शिक्षकांना दिली. यानंतर उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या आमदार जयंत आसगावकर यांच्यासमोर मांडल्या. तसेच काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. यामध्ये शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, सेवानिवृत्ती शिक्षकांच्या भरतीचा जीआर रद्द करावा, थकीत वेतनाचा निर्णय त्वरित व्हावा, पोस्टाने निवड व वरिष्ठ श्रेणीच्या ऑर्डर पाठवू नये, मुख्याध्यापक मान्यता 15 दिवसात निर्गमित करावेत, अनुकंपाचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी केली. यानंतर आमदार जयंत आसगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना केल्या.
यावेळी आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सेवा हमी कायद्यानुसार 15 दिवसात फाईलीतील त्रुटीची पूर्तता करून ती निर्गमित कराव्यात. शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलेल्या फाईली गतीने मार्गी लावाव्यात, झिरो पेंडन्सी कामे करावी, वैयक्तिक मान्यता, मेडिकल बिले, आदी संबंधित असलेल्या फाईलीवर जागेवर निकाल देण्याच्या सूचना दिल्या. या सभेला सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक संघटनांचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
