कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडीस पाठिंबा देणारे माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरूडकर यांनी आज सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या भेटीत सत्ताधारी गटास पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. सत्यजित आबांच्या घरवापसीमुळे विरोधी गटाला धक्का बसला आहे.
तीन दिवसांपूर्वीच सत्ताधारी गटाविरोधात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे आदींसह आजी माजी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा केली होती. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील हेही उपस्थित होते.
मात्र त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सत्यजित पाटील यांनी या निर्णयावर फेरविचार करावा यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे आबानी घरवापसी करण्याचा निर्णय जाहीर केला.
आज सत्यजित पाटील यांच्या भेटीत आमदार पी.एन.पाटील आणि महादेवराव महाडिक यांना घेऊन सत्ताधारी आघाडीसोबत राहत असल्याचा विश्वास आबानी दिला. शाहुवाडी – पन्हाळा तालुक्यातील निर्णायक ठराव आबा यांच्याकडे आहेत, त्यामुळे शाहू आघाडीला हा धक्का मानला जात आहे.