करवीर :
सडोली खालसा (ता.करवीर) येथे आमदार पी.एन.पाटील विचार मंच व ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील पोलीस यांच्यासह सर्व कोरोना योद्ध्यांचा सत्कार पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जि.प. सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
होते. गोकुळचे संचालक उदय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विचार मंचच्या वतीने विविध ठिकाणी सेवा बजावणारे गावातील ५० पोलीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस , आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक , तलाठी , पोलीस पाटील, एसटी कर्मचारी, सर्व दूध संस्था कर्मचारी अशा सुमारे ८० कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अभिमानस ग्रुपतर्फे सडोली खालसासह ५० गावे स्वखर्चाने निर्जंतुकीकरणाचे काम केल्याबद्दल श्रीकृष्ण लोहार व अभिषेक लोहार यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. या काळात स्वतः च्या कुटुंबीयांना आलेल्या अनंत अडचणींकडे दुर्लक्ष करून समाजहिताला प्राधान्य दिले. या कार्यातूनच जनतेला पोलिसांत देव दिसू लागला. कोरोनाच्या कठीणप्रसंगी पोलिसांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच आमदार पी.एन.पाटील विचार मंचने हा कार्यक्रम घेऊन कोरोना योद्ध्यांना नवऊर्जा दिली असल्याचे सांगितले.
जि.प.सदस्य राहूल पाटील म्हणाले, कोरोना योद्धांनी संकट काळात प्रामाणिक सेवा बाजावल्यामुळेच कोरोनाचे संकट थोपविण्यास मदत झाली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. भविष्यात कसलीही अडचण आली तर आमदार पी. एन. पाटील साहेब व आपण आपल्या पाठीशी ठाम उभा राहू असा विश्वास दिला.
यावेळी कार्यक्रमास आयोजक विश्वजित पाटील यांच्यासह सर्व कोरोना योद्धे, गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक प्रा.निवास कुंभार यांनी केले. आभार संजय साळुंखे यांनी मानले.