कोल्हापूर :
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
कोविड 19 विषाणू संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात असल्याने विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले.