विविध दूध संस्थांच्या वतीने : गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांचा सत्कार
करवीर :
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे विविध
दूध संस्थांच्या वतीने गोकुळच्या
चेअरमन पदी तीनवेळा निवड व दूध दरवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल विश्वास पाटील (आबाजी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्व दूध संस्थांच्या वतीने बहिरेश्वर येथील दिनकर माणकू दिंडे संस्थेचे चेअरमन भगवान दिंडे यांच्या वतीने चेअरमन विश्वास पाटील यांचा फेटा, हार घालून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) म्हणाले, गोकुळमध्ये काटकसरीने कारभाराला प्राधान्य दिले आहे. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दूध उत्पादकांनी म्हैस दुधाचे उत्पादन वाढवावे. सर्वांत जास्त दर देणारा गोकुळ दूध संघ आहे. तुमची सर्वांची साथ यापुढे कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून भागातील हसुर दुमाला, घानवडे, शिरोली दुमाला, बोलोली दुर्गुळेवाडी, चाफोडी बेरकळवाडी, बहिरेश्वर येथील विविध कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अजून काही कामासाठी निधी लागला तर कळवा, त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू आणि भागात राजकारण न पाहता विकासाला प्राधान्य देऊ, असे प्रतिपादनही चेअरमन पाटील यांनी केले.
प्रारंभी वीरशैव बँकेचे चेअरमन अनिल सोलापुरे यांनी स्वागत केले. महे ग्रामपंचायत सदस्य एस.डी.जरग, अनिल बचाटे, विनायक देसाई, वैभव कांबळे आदींची मनोगते झाली. सुपरवायझर भानुदास पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास तुकाराम पाटील, माजी सरपंच नंदकुमार पाटील , माधव पाटील, एस.के.पाटील, उपसरपंच सचिन पाटील, माजी पं.स.सदस्य सुनील पाटील, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, भीमराव माळी, अजित पाटील, नाना पाटील यांच्यासह करवीरच्या पश्चिम भागातील दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.