प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये
सहभागी होण्यास शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
कोल्हापूर :
प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या नजिकच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधून आपली संपूर्ण वैयक्तिक तपशीलासह नोंदणी करावी. या मोहिमेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी एम.एल. कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके हे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे अविभाज्य घटक आहेत. फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादन क्षेत्रातीलच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, मोठे प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतक-यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबी विचारात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण-प्रक्षेत्र प्रशिक्षण हा कार्यक्रम राबवावायाचा आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
फळबाग/भाजीपाला/फुले लागवड/आंबा/पेरु सधन लागवड/विदेशी फळपिक लागवड,
फळबाग व्यवस्थापन/बहार व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, एकात्मिक किड/रोग/अन्नद्रव्ये व्यवस्थापन, काढणीपश्चात व्यवस्थापन- प्राथमिक प्रक्रिया केंद्र-काजू/बेदाणा/सिताफळ/आवळा/डाळींब प्रक्रिया इ. शीत साखळी, रायपनिंग चेंबर, शीत वाहन इत्यादी, बाजारपेठ/ उपलब्धता/निर्यात/Phytosanitory/Pesticide Residue Management इ.बाबत मार्गदर्शन, व कृषि पर्यटन असे प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे विषय असणार आहेत.
प्रशिक्षणाकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबीसाठी खर्चाचे मापदंडानुसार प्रति शेतकरी प्रति दिन 1 हजार रुपये याप्रमाणे जास्तीत-जास्त 5 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य देय राहिल, असेही कृषि विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.