या डोंगरात झाले मोठ्या प्रमाणात भूसखलन
कोल्हापूर :
अतिवृष्टीमुळे करवीर तालुक्यातील बोलोली पैकी शिपेकरवाडीच्या डोंगरात मोठ्या प्रमाणावर भूसखलन झाले आहे. यामुळे
दोन एकर शेतीचे क्षेत्र काही ठिकाणी दहा फुटाने , तर काही ठिकाणी पाच फुटाने खाली बसले आहे, यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. भुसखलन झाल्यामुळे शेतकरी बाजीराव बाटे यांचे पिकाचे, शेतजमिनीचे व झाडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जवळच डोंगरात राहणार्या चार कुटुंबांना भूसखलनाचा धोका निर्माण झाला आहे.पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.डोंगरात भूसखलन प्रकार वाढत आहेत, यामुळे शासनाने भूवैज्ञानिक यांचेकडून पाहणी करावी अशी मागणी यावेळी केली .

बोलोली पैकी शिपेकरवाडीच्या डोंगरात बाजीराव श्रीपती बाटे यांची अडीच एकर शेती आहे . या शेतीच्या जवळच दोनशे फुटावर चार शेतकऱ्यांची राहती घरे आहेत .
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे या डोंगरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.
या ठिकाणी बाजीराव बाटे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे क्षेत्रात भूस्खलन झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी शेतीचा भाग दहा फुटाने, तर काही ठिकाणी पाच फुटाने खाली सरकला आहे . आणि डोंगराच्या खालच्या बाजूला पाच फूट जमीन वर चढली आहे .
या मध्ये सुमारे दीड एकरातील नाचना पिकाचे नुकसान झाले, आणि भात पिकाचे नुकसान झाले आहे,मोठ मोठया चरी पडल्या आहेत, आणि या मधून डोंगरात मुरलेले पाणी वाहत आहे ,काही झाडे सरकली आहेत, मोठमोठे दगड सरकून खाली आले आहेत.
या ठिकाणाहून कोणताही पाण्याचा ओढा नसताना जमिनीमध्ये अंतर्गत हालचाली होऊन जमीन सरकली आहे असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान भूस्खलन झालेल्या ठिकाणी 200 फुटावर नामदेव बाटे,विलास बाटे,धोंडीराम बाटे,पंडित बाटे त्यांची राहती घरे आहेत . या घरानाही भविष्यात धोका निर्माण होणार आहे.
घटनास्थळी तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.