रयत सेवा संघाची ६१ वी वार्षिक सभा खेळीमेळीत
करवीर :
पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील रयत सेवा संघाची ६१ व्या वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली.
प्रारंभी स्व. श्रीपतराव बोंद्रे व एस.आर.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मार्गदर्शक संचालक विश्वासराव पाटील (आबाजी ) व मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त इंद्रजित गाट यांचा विशेष सत्कार झाला.
यावेळी बोलताना मार्गदर्शक संचालक विश्वासराव पाटील (आबाजी ) म्हणाले, रयत संघ स्व. श्रीपतराव बोंद्रेदादानी स्थापन केला. स्व.एस.आर.पाटील यांनी तो वाढवीला. त्यांच्या विचारानेच संघाची वाटचाल सुरू आहे.
रयत संघाच्या मिश्रखतांची तपासणी केंद्रीय तपास पथकाने केली. आम्ही मिश्रखते करतो मात्र अहवाल गोळी खताचा आला आहे. त्यामुळे या
बाबत आम्ही संबंधित विभागाला कळविले आहे. कृषी मंत्र्यांना भेटून निदर्शनास आणून दिले आहे. संघाची बैलजोडी छाप हातमिश्रखते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत. त्यामुळे या खतांच्या उत्पादनास आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी कोर्टात जाऊ. कोणत्याही परिस्थितीत संघाची हातमिश्रखते चालूच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चेअरमन सचिन पाटील यांनी दरवर्षी सभासदांना १५ % डिव्हीडंड देतो, सतत अ ऑडिट वर्ग आहे. असल्याचे सांगत संघाच्या कार्याचा आढावा घेतला.
व्यवस्थापक तानाजी निगडे यांनी मागील सभेचा वृत्तांत व विषय वाचन करून संघाच्या एक वगळता सर्व शाखा नफ्यात असल्याचे सांगितले.
चर्चेदरम्यान अनिल सोलापुरे यांनी पेट्रोल पंप सुरू करण्याची व व्यावसायिकता आणावी अशी
मागणी केली.
जास्त खते खरेदी करणाऱ्या या विकास संस्था व शेती सेवा केंद्रे व शेतकऱ्यांचा झाला सत्कार :
विकास संस्था गटात – बलभीम विकास संस्था (देवाळे), कांडगाव विकास संस्था (कांडगाव), केर्ले विकास (केर्ले),
कृषी विकास केंद्र गटात दत्त ऍग्रो सर्व्हिसेस( करंजफेण), माऊली शेती सेवा केंद्र (मरळी), पंचगंगा अँग्रो, गणेश कृषी केंद्र(घालवाड),
व्यक्ती गटात गणपती जाधव (वळिवडे), चंद्रकांत पाटील (पाडळी खु.), कृष्णात पाटील (कुडीत्रे) यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
सर्वसाधारण सभेला संचालक नेमगोंडा पाटील, माधुरी जाधव, कुंडलिक पाटील, विलास पाटील, शिवाजी भोसले, निर्मला निगडे यांच्यासह सर्व संचालक , सभासद, संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन संचालक शिवाजी देसाई यांनी मानले.