रोहयोअंतर्गत मजुरांकडून शक्य नाही त्या ठिकाणी मशीनने काम करून घ्यावे
अप्पर मुख्य सचिव नंदकुमार
• जिल्ह्यात रोहयोची कामे वाढली पाहिजेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत
• रोहयो अंतर्गत कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल
• अडीचशेपेक्षा अधिक शासकीय योजनांची कामे रोहयोअंतर्गत करता येतात याबाबत जनजागृती करावी
• रोहयोअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे घेऊन लोकांना शाश्वत पैसा मिळवून देण्याची संधी निर्माण करावी
• जलसंधारण म्हणजे पाण्याच्या प्रत्येक थेंबातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ घडवून आणणे होय
• प्रत्येक शेताला पाणी, कुटुंबाला काम व प्रत्येक जण लखपती होण्यासाठी प्रयत्न करावेत
• जिल्ह्यातील भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन व ऊस या पिकांची उत्पादकता राज्य व देशा पेक्षाही अधिक
कोल्हापूर :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करत असताना जे काम मजुरांना करणे शक्य होत नाही अशी कठीण कामे करण्यास संबंधित विभागाच्या तालुकास्तरीय प्रमुखांची मंजुरी घेऊन ते काम मशीनने करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांच्या आढावा बैठकीत विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी डी.एस. प्रकशाळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. अजगेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दत्तात्रय कवितके तसेच सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
अप्पर मुख्य सचिव श्री. नंदकुमार पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गतची कामे मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. प्रत्येक गावात किमान एका यंत्रणेची पाच कामे तरी शेल्फवर असली पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत. या अंतर्गत जे अधिकारी काम करणार नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले.
रोहयोअंतर्गत अडीचशेपेक्षा अधिक योजनांची कामे घेता येतात तरी अधिकाऱ्यांनी या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्या योजना त्यांच्या शेतात राबविण्याबाबत प्रोत्साहित करावे तसेच गावातील मजुरांचे प्रबोधन करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. तसेच लोकांना मोठ्या प्रमाणावर शाश्वत पैसा मिळून आर्थिक उन्नती होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना श्री. नंदकुमार यांनी केली.
जलसंधारण म्हणजे पाणी अडवणे व जिरवणे नसून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ घडवून आणणे होय. पाणी वापराचे गणित समजलं पाहिजे. त्यानुसार पिकांची निवड करून उत्पादन वाढविण्यासाठी यंत्रणानी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्री. नंदकुमार यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा हा शेती प्रधान असून 4 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्र शेती पिकाखाली असून 6 लाख 60 हजार 676 खातेदार आहेत. जिल्ह्यातील भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन व ऊस या पिकांची उत्पादकता राज्य व देशापेक्षाही अधिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. तसेच रोहयो अंतर्गत 3 लाख 28 हजार मजुरांची जॉब कार्ड संख्या आहे. गावनिहाय योग्य नियोजन केले असून पुढील काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले व जिल्ह्यातील रोहयो कामांची माहिती पीपीटीद्वारे सादर केली.
सकारात्मक मानसिकता ठेवून मोठ्या प्रमाणावर रोहयो अंतर्गत कामे वाढविण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री. प्रकशाळे यांनी जलसंधारण अंतर्गत कशा पद्धतीने पाण्याचा वापर करावयाचा व त्याचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळवून देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) दत्तात्रय कवितके यांनी प्रास्ताविक केले व शेवटी उपस्थितांचे आभार मानले.