जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर :
मागील वर्षाप्रमाणेच धरणातील पाणी नियंत्रीत करून संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रतीनिधी, सामाजिक संस्था यांची दूरदृश्यप्रणालीव्दारे मान्सून पूर्व आढावा बैठक आज झाली.

खासदार धैर्यशील माने, आमदार अरूण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव हे सहभागी झाले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पेालीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, पाटबंधारे विभागाने मागील दहा वर्षाचा अभ्यास करून याबाबत नियोजन केलं आहे. जिल्ह्यामध्ये 25 ते 30 जुलै आणि 8 ते 12 ऑगस्ट या दरम्यान पूर येतो. 2019 ला आलेल्या पुराचा अनुभव पाहता मागील वर्षी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण करण्यात आले होते. याही वर्षी त्याच पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोव्हिडच्या अनुषंगाने संभाव्य पूरग्रस्त गावातील लोकांच्या स्थलांतरणाबाबतही नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मोटराईजड बोटी असून नवीन सात बोटी घेण्यात येत आहेत. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षात प्रत्येक विभागाचा एक प्रतिनीधी कार्यरत असतो. सातारा, सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कात याही जिल्ह्याचा विभाग असून येणाऱ्या आपत्तीपासून सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला नियंत्रीत ठेवू.
खासदार श्री. माने म्हणाले, दर वर्षी स्थलांतरण करणं शक्य नसते. त्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक आहे.
आमदार श्री. आवाडे म्हणाले, धरणातील पाणी सोडायचं नियोजन हवं.
आमदार श्री. लाड म्हणाले, अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याबाबत समन्वय हवा.
आमदार श्री. जाधव म्हणाले, मागील वर्षी प्रशासनाने चांगले नियोजन केले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी नियोजन होईल.
आमदार श्री. पाटील म्हणाले, चंदगडसाठी मोटर बोटची आवश्यकता आहे. महावितरणने आधीपासूनच साधनसामुग्रीची तयारी ठेवावी.
जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील असणाऱ्या तीन धरणातील गाळ काढण्याबाबत सूचना दिली.
पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महापालिकेचे अतिरिकत् आयुक्त नितीन देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत मासाळ यांनी संगणकीय सादरीकरण करून पूर्व तयारी सविस्तर माहिती दिली. आर.के. पोवार, सर्जेराव पाटील, शिवाजी मोरे, सत्यजीत जाधव, अशोक रोकडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, ए.बी. पाटील यांनीही सहभागी होऊन सूचना मांडल्या.