शाहू साखर कारखाना : देश पातळीवरील “अतिउत्कृष्ट” साखर कारखाना पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली या शिखर संस्थेमार्फत गळीत हंगाम २०२२-२०२३ साठी जाहीर झालेला देशपातळीवरील ‘ अति उत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या शुभ हस्ते शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
कारखान्याच्या वतीने शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री विरकुमार पाटील यांनी तो स्वीकारला.
या शानदार सोहळ्यास मा. कृष्ण पाल, राज्य मंत्री (सहकार)मा. चौधरी लक्ष्मी नारायण सिंह,गन्ना विकास मंत्री उत्तर प्रदेश, मा. हर्षवर्धन पाटील अध्यक्ष, नॅशनल शुगर फेडरेशन न्यू दिल्ली मा.ईश्वरभाई पटेल माजी सहकार मंत्री ,गुजरात राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू साखर कारखान्याने आपल्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर पारितोषिक मिळवण्याची परंपरा अखंडित ठेवली असून शाहू कारखान्यास मिळालेला हा सत्तरावा पुरस्कार आहे .
कारखान्याच्या वतीने उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, यांच्यासह, सहकारी संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.