आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांना ‘ सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार ‘ : सहकारातील कार्याचा मोठा गौरव
कोल्हापूर :
संगमनेर (जि. अहमदनगर) येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा ‘ सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांना जाहीर झाला आहे. ७ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान होत आहे आणि आमदार पाटील यांचा वाढदिवस ६ जानेवारी रोजी असतो. या पुरस्कारामुळे त्यांच्या यावर्षीच्या वाढदिवसाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
काँग्रेसचे राज्याचे वरिष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आयोजनाने संगमनेर (जि. अहमदनगर) येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्ष भव्यदिव्य स्वरूपात साजरा होत आहे. या निमित्ताने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा ‘ सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार ‘ आमदार पी. एन. पाटील यांना जाहीर झाला असून संगमनेर येथे ७ जानेवारीला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
आमदार पी.एन.पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक, भोगावती साखर कारखाना, राजीवजी गांधी सहकारी सूतगिरणी, श्रीपतरावदादा बँक, निवृत्ती तालुका संघ या सहकारी संस्थातील भरीव कार्य व सहकारात घालून दिलेला चांगल्या कामाचा आदर्श यांचा विचार करून निवड समितीने त्यांची निवड केली आहे.
संगमनेर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असणार आहेत. सदरच्या कार्यक्रमास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच.के.पाटील, सन्माननीय अतिथी म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते भास्कर जाधव, माजी वि.प. सदस्य डॉ. सुधीर तांबे उपस्थित राहणार आहेत.