सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून प्रचार घराघरापर्यंत पोहचवा : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती ( अभ्यासू, संवेदनशील शाहू छत्रपती महाराजांना विजयी करण्याचे आवाहन )
कोल्हापूर :
शककर्ते शिवाजी महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा, आचार- विचार घेऊन विद्यमान शाहू छत्रपती महाराज कार्य करत आहेत. ते प्रचंड अभ्यासू, संवेदनशील, संस्कारी, समतावादी विचारांचे व विकासाचे व्हिजन घेऊन जाणारे नेतृत्व आहे. जनतेचे प्रश्न आपले प्रश्न मानून ते सोडविण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी फसरविल्या जातात. त्यासाठी महिलांनो आपणही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून शाहू छत्रपतींचा प्रचार घराघरापर्यंत पोहचवा, योग्य कोण, अयोग्य कोण लोकांना पटवून द्या असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त आयोजित कोल्हापूर येथील जाधववाडी, घोडकेवाडी, बापटकॅम्प, भोसलेवाडी परिसरातील संयुक्त महिला संपर्क दौऱ्यात त्या बोलत होत्या.
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, प्रभू राम आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत. त्यामुळे नव्याने कोणी रामभक्ती शिकविण्याची गरज नाही. आज जी मंदिरे आहेत ती केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच अस्तित्वात आहेत हे आपण विसरून चालणार नाही. महापूर काळात शाहू छत्रपती स्वतः मदतीसाठी पुढे होते. कोल्हापूरच्या कला क्रीडा, साहित्य क्षेत्राला पाठबळ देण्यात अग्रेसर असतात. जातीय दंगल झाली तेव्हा त्यांनीच पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरले. ज्या ज्या वेळी गरज पडेल तेव्हा तेव्हा छत्रपती घराणे समाजासाठी पुढे आले आहे.
माजी महापौर वैशाली डकरे म्हणाल्या, मोदी सरकार फक्त जाहिरातबाजीचे सरकार आहे. खोटी आश्वासने देऊन फसविण्याचे काम सुरु आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, नवीन उद्योग यावर बोलायला सरकार तयार नाही. सरकारी शाळा मोडायचे चालले आहे. जातीच्या, धर्माच्या नावावर दिशाभूल करत आहेत, मात्र येथे जातीपातीला थारा नाही. सर्वानी मिळून सर्वामान्यांचे उमेदवार शाहू छत्रपतींना विजयी करूया.
यावेळी कोमल घोडके, संयोगिता घाटगे, उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी नगरसेविका संगीता काटकर, वैशाली नंदकिशोर डकरे, रूपाली कसबेकर, माधुरी सपाटे, माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, माजी नगरसेवक राजेंद्र कसबेकर, माजी नगरसेवक प्रकाश कुंभार, माजी नगरसेवक नंदकिशोर डकरे, माजी नगरसेवक प्रकाश सरवडेकर, अमरनाथ काटकर, सागर डकरे, महेश वारके, धोंडीराम घोडके यांचेसह पदाधिकारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.