गलिच्छ राजकारणाचा खेळ मांडणाऱ्या भाजपला धडा शिकवा : डॉ. नंदाताई बाभुळकर ( गडहिंग्लज तालुक्यातील नूल विभागात संभाजीराजे छत्रपतींचा प्रचार दौरा )
गडहिंग्लज :
भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देणारे आज भ्रष्टाचाऱ्यांनाच घेऊन फिरत आहेत, त्यामुळे भाजप हाच भ्रष्टाचारी पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात गलिच्छ राजकारणाचा खेळखंडोबा मांडला आहे. जे स्वतः चा पक्ष आत्मनिर्भर करू शकले नाहीत ते देश काय आत्मनिर्भर काय करणार?. या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असा घणाघात करत सर्वांनी गटतट विसरून निष्कलंक व अभ्यासू शाहू छत्रपती महाराजांना निवडून द्यावे असे आवाहन डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी केले.
महाविकास व इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांनी नुल (ता. गडहिंग्लज)विभागातील हनिमनाळ, शेंद्री, औरनाळ, माद्याळ, दुंडगे, हेब्बाळ, हसूरचंपू, हिटणी, मुतनाळ, निलजी, नुल, मुगळी, तनवडी, हणमंतवाडी, खमलेहट्टी / शिंदेवाडी गावांचा प्रचार दौरा केला. दौऱ्यात येथील ग्रामस्थांनी आम्ही छत्रपती शाहू महाराजांना विजयी करणारच असा निर्धार व्यक्त केला.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, जनतेचा प्रचंड उत्साह पाहता शाहू छत्रपती महाराजांचा विजय निश्चित आहे. सर्वांना विश्वास देतो की, प्रत्येक तालुक्यातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शाहू महाराज, मी, सतेज पाटील, इंडिया आघाडीचे भागातील सर्व प्रमुख मंडळी सातत्याने आपल्या संपर्कात राहतील यात कोणतीच शंका राहणार नाही.
गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, दिल्लीत न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे ठोकणारे हे सरकार आहे. महिला सुरक्षित नाहीत. १५ लाखाच्या भाजपच्या चुनावी जुमल्याला पुन्हा भुलायचं नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे.
गडहिंग्लज पं. स. माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, भाजपने खोट्या घोषणा करून जनतेला फसविले आहे. महागाईने जनता त्रस्त असून शेतकरी भरडला आहे. गरिबांच्या शाळा बंद पाडायचे षडयंत्र सुरु आहे. देशातील अराजकतेला आळा घालायची ताकद शाहू छत्रपती महाराज यांच्यात आहे.
यावेळी राष्ट्रवादी पवार गटाचे शिवप्रसाद तेली, अमर चव्हाण, रामराज कुपेकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, सोमगोंडा आरबोळे, तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, शिवाजीराव खोत, संजय पवार, सूरज माने, शिवाजी राऊत, अजिंक्य चव्हाण, सुमित चौगले, अजित खोत यांच्यासह महाविकास आघाडी, जनता दल, वंचित आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.