राजकारणाची प्रतिमा उंचाविण्यासाठी शाहू छत्रपती महाराजांसारख्या प्रतिनिधीची गरज : संभाजीराजे छत्रपती ( नेसरी येथील प्रचार दौऱ्यात जनतेशी संवाद )
कोल्हापूर :
आज संपूर्ण देशभरात पक्ष फोडाफोडी, राज्य सरकार पाडापाडी, आज एका पक्षात उद्या एका पक्षात उड्या मारणे असले प्रकार होऊ लागले आहेत. विकासाचे राजकारण न करता लोकशाहीला धोका पोहचेल अशा पद्धतीचे वर्तन सुरु झाले आहे. राजकारणाची उंची खालावत आहे. अशा वेळी चांगल्या विचाराचे, अनुभवाचे खासदार निवडले पाहिजेत. राजकारणाची प्रतिमा उंचाविण्यासाठी शाहू छत्रपती महाराजांसारख्या प्रतिनिधीची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा प्रचार दौरा सुरु आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा ते कार्यरत आहेत. लोकसभा मतदारसंघाचे महाविकास इंडिया आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ संभाजीराजेश छत्रपती यांनी नेसरी येथे प्रचार दौरा केला.
यावेळी संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले,
ज्यांनी टिका केली त्यांना माझ इतकंच सांगणे आहे; छत्रपती घराण्याला टिका काही नवीन नाही. अशा टिकेला आम्ही घाबरतही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते विद्यमान शाहू छत्रपती महाराजांना टिका सहन करावी लागली आहे. पण छत्रपती घराणे सदैव लोकहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी सक्रीय राहीले आहे. खासदारकीच्या काळात मी काय केल हे विचारणाऱ्यांनी एका व्यासपीठावर यावे, असा इशाराही त्यांनी दिला.
याप्रसंगी नंदाताई बाभूळकर, गिरीजादेवी शिंदे, रामराजे कुपेकर, संग्राम शिंदे , अजित शिंदे, संयोगितादेवी शिंदे, आजी माजी सैनिक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.